आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या वर्धापन दिनावर पावसाने पाणी फेरले; कार्यक्रम रद्दचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या आणि नालेसफाईचा केवळ फार्स करणाऱ्या शिवसेनेला पावसाने शुक्रवारी चांगलाच दणका दिला. सकाळपासून सुरु असलेल्या पावसाने संपूर्ण मुंबई जलमय झाल्याने शिवसेनेला अखेर नाईलाजाने पक्षाचा सुवर्णमहोत्सवी वर्षाचा वर्धापन दिन सोहळा रद्द करावा लागला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही
माहिती दिली.


शिवसेना यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्ताने मुंबईच्या षण्मुखानंद हॉल येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित राहाणार होते. संपूर्ण राज्यभर निमंत्रणेही गेली होती त्यामुळे शिवसैनिकांनीही मुंबईकडे कूच करण्यास सुरुवात केली होती. परंतु शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबई जलमय झाली. पाणी तुंबल्याने नागरिक त्रस्त असताना शिवसेनेचे नेते मात्र रस्त्यावर दिसत नव्हते.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाऊस असला तरी वर्धापन दिन साजरा करावा असा सूर काही नेत्यांनी काढला होता. परंतु रेल्वे सेवा बंद असल्याने शिवसैनिकांना येणे शक्य होणार नाही हे लक्षात आल्याने दुपारी नाईलाजाने शिवसेनेने वर्धापन दिन सोहळा रद्द केला. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईकर त्रस्त असताना वर्धापन दिन सोहळा साजरा करणे योग्य ठरणार नाही त्यामुळे वर्धापन दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती संजय राऊतयांनी दिली. तसेच मुंबईकरांच्या मदतीसाठी शिवसैनिक सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाणी का तुंबले, चाैकशीचे अादेश
मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून शिवसेना २५ वर्षांपासून काम करीत आहे. तरीही पाणी तुंबले पाणी का तुंबले याची चौकशी करण्याचे आदेश मुंबईचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले अाहेत. तसेच शिवसैनिक मुंबईकरांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरले असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.