आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Urge Sharad Pawar\'s For Balasaheb Tharkare Memorial

शिवसेनाप्रमुखांचे स्‍मारकः शरद पवारांच्‍या भेटीवरुन महापौरांची सारवासारव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वर्षभर खटाटोप करूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम मार्गी लागत नसल्याने शिवसेना नेत्यांनी अखेर सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना साकडे घातले. पवारांनीही सकारात्मक प्रतिसाद देत स्मारकाच्या महापौर बंगल्यातील प्रस्तावित जागेची पाहणी केली.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत, गटनेते सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, आमदार रामदास कदम, गजानन कीर्तिकर आणि लीलाधर डाके यांच्या शिष्टमंडळाने ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन पवारांची भेट घेतली व स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत करण्याची विनंती केली.
शिवाजी पार्कवरच स्मारक व्हावे, यासाठी अडून बसलेल्या शिवसेना नेत्यांना कायद्याच्या बडग्यामुळे अखेर आपला हट्ट मागे घ्यावा लागला होता. त्यानंतर महालक्ष्मी रेसकोर्सवर थीमपार्क उभारण्याची उद्धव ठाकरेंची कल्पना शिवसेना नेत्यांनी उचलून धरली, मात्र त्यालाही राज्य सरकारने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत काहीच ठोस हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी गेल्या महिन्यात, तर बाळासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र जयदेव ठाकरे यांनी पहिल्या स्मृतिदिनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ही टीका उद्धव यांच्या जिव्हारी लागली आणि सोमवारी तातडीने हालचाली झाल्या.
पवारांचा स्वत:हून पुढाकार : संजय राऊत
शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, स्मारकाच्या मुद्दय़ावर रविवारी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात चर्चा झाली. स्मारकासाठी आपण स्वत: पुढाकार घेणे योग्य नसल्याचे उद्धव यांनी त्या वेळी पवार यांना सांगितले. त्यामुळे पवारांनीच यात लक्ष घालण्याची तयारी दर्शवली. या मुद्दय़ावर सर्वपक्षीय बैठकही बोलवण्याचे आश्वासन पवार यांनी सेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
रखडलेले स्मारक..
0 गतवर्षी 18 नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुखांवर शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी सेना नेत्यांनी केली होती.
0 राज ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मात्र विरोध
0 शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान असल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त बांधकाम करता येणार नसल्याचा निर्वाळा पालिका व न्यायालयानेही दिला.
0 महालक्ष्मी रेसकोर्स मैदानावर थीमपार्क बनवून त्या ठिकाणी स्मारक उभारण्याचाही प्रयत्न सरकारने उधळून लावला.
महापौर बंगल्याची पाहणी
‘बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठी मी जातीने लक्ष घालीन’ असे आश्वासन देत पवारांनी सोमवारी स्मारकाची प्रस्तावित जागा असलेल्या महापौर बंगल्याची पाहणी केली. त्यांच्यासमवेत छगन भुजबळ, महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे होते. या जागेबाबत पवारांनी पालिका अधिकार्‍यांशी चर्चा करून स्मारकाच्या उभारणीत सीआरझेडच्या अडचणीही समजून घेतल्या. स्मारकासाठी पालिकेने नव्याने जागा शोधावी, असे आदेश पवारांनी या वेळी पालिका अधिकार्‍यांना दिल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
महापौरांची सारवासारव
पवार यांनी महापौर बंगल्याची पाहणी केल्याबद्दल शिवसेनेचे नेते अधिकृत बोलण्यास तयार नाहीत. ‘संयुक्त महाराष्ट्राचे दालन पाहण्यासाठी पवार आले होते. स्मारकाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही,’ अशी सारवासारव महापौरांनी केली.