आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुरस: शिवसेना-मनसे चार ठिकाणी आमने-सामने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे मराठी मतांमध्ये फूट पाडण्याचे काम करणार, असा आरोप शिवसेनेतर्फे केला जात आहे. मनसेने शनिवारी दोन उमेदवार उभे केले, तेही शिवसेनेच्याच मतदारसंघात आहेत. मनसेचे हे उमेदवार पाहता शिवसेनेचा हा आरोप खरा असावा, असे वाटते. इतरही काही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेना-मनसे उमेदवारांमधील या निवडणुकीत लढत रंगतदार ठरणार आहे.

मुंबईत तीन महत्त्वाच्या मतदारसंघांत मनसेने उमेदवार उभे केले आहेत. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेनेने राहुल शेवाळे यांना तिकीट दिले असून मनसेने आदित्य शिरोडकर यांना उभे केलेले आहे. काँग्रेसतर्फे खासदार एकनाथ गायकवाड यांनाच यंदाही तिकीट देण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण मतदानापैकी गायकवाड 43 टक्के मते घेऊन विजयी झाले होते, तर शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांना फक्त 30.36 टक्केच मते मिळाली होती. गेल्या वेळी मनसेने श्वेता परुळेकर यांना या मतदारसंघात उभे केले होते. श्वेता परुळेकर यांना तेव्हा एक लाख मते मिळाली होती. त्यामुळेच शिवसेनेच्या सुरेश गंभीर यांना पराभव पत्करावा लागला होता.

दक्षिण मुंबईतही शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्या विरोधात मनसेने बाळा नांदगावकर यांना उभे केले आहे. गेल्या वेळीही नांदगावकर यांच्यामुळे काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांना विजय मिळवणे सोपे झाले होते. 2009 च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी एकूण मतदानापैकी 42.46 टक्के मते घेतली होती, तर बाळा नांदगावकर यांनी 24.9 टक्के मते घेऊन दुसरे स्थान प्राप्त केले होते. या वेळी अरविंद सावंत यांची मते खाण्याचे काम बाळा नांदगावकर करणार आहेत.
कल्याणमध्ये शिवसेनेने ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मुलाला डॉ. श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे असून मनसेचे राजीव पाटील यांना येथून तिकीट दिलेले आहे. आपनेही नरेश ठाकूर यांना येथून उभे केलेले आहे. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेत असलेल्या आनंद परांजपे यांनी 39 टक्के मते घेत राष्ट्रवादीच्या वसंत डावखरे (34.56 टक्के मते) यांचा पराभव केला होता. या वेळेस आनंद परांजपे राष्ट्रवादीत असल्याने शिवसेनेला जागा जिंकणे तसे कठीणच जाणार होते. मनसेने आपला उमेदवार दिल्याने शिवसेनेला येथे कमालीची ताकद लावावी लागणार आहे.

मनसेने नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्यासमोर प्रदीप पवार यांना तिकीट दिले आहे. 2009 मध्ये समीर भुजबळ यांनी 36.34 टक्के मते मिळवून मनसेच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. हेमंत गोडसे यांना 32.98 टक्के मते मिळाली होती. या वेळेस गोडसे हे शिवसेनेचे नाशिकचे उमेदवार आहेत.

अटीतटीची लढाई
ठाणे मतदारसंघातून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांच्यासमोर राजन विचारे यांना उभे केले आहे. या दोघांमध्ये आता शिवसेनेतून मनसेत प्रवेश केलेल्या अभिजित पानसे यांनी उडी घेतली आहे. आपने संजीव साने यांनाही येथून तिकीट दिले असल्याने मतांची फूट अटळ आहे. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या संजीव नाईक यांनी 40.14 टक्के मते मिळवली होती, तर शिवसेनेच्या विजय चौगुले यांनी 33.6 टक्के मिळाली होती. राजन विचारे संजीव नाईक यांना अटीतटीची लढत देऊ शकले असते; परंतु आता अभिजित पानसे आल्याने त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे.