आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेकडून दबावतंत्र; भाजपचीच खाती हवीत, नवा तिढा होणार निर्माण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपने खातेवाटप जाहीर केले असले तरी भाजपकडे असलेली काही खाती शिवसेनेला हवी आहेत. आधीच त्यांनी या खात्यांवर दावा केला होता. त्यामुळे शिवसेना आता अडून राहिल्यास सत्ता सहभागाच्या चर्चेत नवा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय शिवसेना सोबत आल्यास खातेवाटप नव्याने करावे लागेल. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी शिवसेनेची सहभागाबाबत चर्चा सुरू आहे. दोन-तीन दिवसांत भाजपतर्फे शिवसेनेला योग्य तो पर्याय सादर केला जाईल. गृह, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, ग्रामविकास अशी खाती शिवसेनेला हवी आहेत.

भाजपकडे महसूल, अर्थ, गृह, नगरविकास, ग्रामविकास, उद्योग, कृषी अशी खाती आहेत. यातील काही खात्यांवर आमचा दावा होता. ती न मिळाल्यास सत्तेत सहभागी होणे अशक्य असल्याचे एक शिवसेना नेता म्हणाला. बोलणी यशस्वी झाल्यास भाजपला खातेवाटपात बदल करावा लागेल, असेही हा नेता म्हणाला.

शिवसेना थोडी मवाळ झाली असली तरी सन्मान राखला जावा; अन्यथा विरोधात बसण्याची आमची मानसिकता आहेच, असेही शिवसेनेचा हा नेता म्हणाला.

अधिवेशनापूर्वी हवा विस्तार
विश्वासमत ठरावासाठी १० नोव्हेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यापूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांसह मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी शिवसेनेची भूमिका आहे. कारण विश्वासमत जिंकले की शिवसेनेवर दबाव टाकत भाजप केंद्राप्रमाणे नाममात्र वाट्यावर बोळवण करील, असे शिवसेनेला वाटते.