आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये सत्ता आल्यास शिवसेना देणार कर्जमाफी; निवडणुकीसाठी वचननामा जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातमधील जनतेवर आश्वासनांची खैरात करणारा वचननामा शिवसेनेने शनिवारी जाहीर केला. गुजरातमधील शेतकऱ्यांना आकर्षित करणारी वचने देणाऱ्या या वचननाम्यात सर्वात महत्त्वाचे वचन आहे गुजरातमधील शेतकऱ्यांची कर्जमाफी. गुजरातमध्ये सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच शिवसेना शेतमालाला योग्य भाव, सिंचन प्रकल्प आणि नर्मदा योजना पूर्णत्वास नेऊन शेताला मुबलक पाणी देण्याचेही वचन दिले आहे. तसेच महाराष्ट्राच्या वचननाम्यातील अनेक वचनांचाही गुजराती जनतेसाठी पुनरुच्चार केला आहे.   

गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकुन करणार नाही असे सांगत निवडणुका न लढण्याची घोषणा करणाऱ्या  शिवसेनेने घूमजाव करत निवडणुकीत ५० च्या आसपास उमेदवार उभे केले आहेत. गुजरातमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून मुंबईतील शिवसेना नेते गुजराती समाजाला विनंती करत असतानाच शनिवारी वचननामा जाहीर करून गुजराती जनतेला लुभावण्याचा प्रयत्न केला आहे.   


शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना गुजरात संपर्कप्रमुख राजुल पटेल, संघटक हेमराज शहा आणि गुजरात राज्यप्रमुख उमेश इंजिनिअर व गोध्रा आमदार हरेश भट्ट यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा वचननामा जाहीर केला.

   
आश्वासनांची खैरात   
वचननाम्यात शिवसेनेने गुजरातच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, सिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव, वीज जोडणी, तरुणांना रोजगार, गुजरातच्या जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी नवीन योजना, शेतकरी नवतरुण-महिला गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाच्या योजना, प्रत्येकाला परवडेल अशी शालेय शिक्षण फी व आरोग्यसेवा, परवडणारी घरे, समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण, महिला सबलीकरण, महिला सुरक्षा, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखण्यासाठी प्रयत्न, व्यसनमुक्ती, व्यापार-उद्योगात वाढ करून रोजगार वाढवणे, जीएसटी दरातील कपातीसाठी प्रयत्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची व्याप्ती वाढवून अधिक सुविधा पुरवण्यावर भर, गुजरात टुरिझमसाठी योजना आदी आश्वासनांची या वचननाम्यात खैरात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...