आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये शिवसेना देणार भाजप बंडखोरांना बळ; गुजरातमध्ये खाते उघडण्याचाही दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अपशकुन’ करणार नाही, असे सांगणाऱ्या शिवसेनेने घूमजाव करीत तेथील विधानसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर अाता तिकीट न मिळालेल्या नाराज भाजप नेत्यांना बळ देऊन शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असल्याचीही माहिती अाहे. ‘गुजरातमध्ये ताकद नसतानाही आम्ही खाते उघडू,’ असा विश्वास शिवसेनेचे गुजरात प्रभारी हेमराज शहा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला.  


शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये पक्षाची काहीही ताकद नाही. परंतु हेमराज शहा आणि नगरसेविका राजुल पटेल यांच्यामुळे शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. शिवसेनेकडे उमेदवार नसल्याने उमेदवार आयात करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भाजपने उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र भाजपचे अनेक नेते तिकीट न मिळाल्याने नाराज आहेत. अशा नाराजांना गळाला लावून शिवसेनेतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. आतापर्यंत १५ ते २० जणांनी शिवसेनेशी संपर्क साधल्याची माहितीही अाहे.  


हेमराज शहा यांनी सांगितले, ‘आम्ही स्वतःहून कोणाकडेही जात नाही आणि भाजपमध्ये फोडाफोडी करण्याचाही प्रयत्न करीत नाही. मात्र आमच्याकडे कोणी आला तर त्याला नाही म्हणणार नाही. गुजरातमध्ये आमची फारशी ताकद नाही तरीही आम्ही सध्या ५५ उमेदवारांची यादी तयार केलेली आहे. अर्ज भरण्याची मुदत २७ नोव्हेंबरपर्यंत असल्याने आमच्या उमेदवारांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.’   


यंदा डिपाॅझिट वाचवू : शहा  
गुजरातमध्ये शिवसेना किती जागा मिळवेल, असे विचारता हेमराज शहा यांनी सांगितले, गुजरातमध्ये आम्ही ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार नाही, आम्ही दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकावर नक्की राहू आणि गुजरातमध्ये शिवसेनेचे खाते नक्कीच उघडेल.’ मात्र किती उमेदवार निवडून येतील याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...