आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena's Six Mp Could Enter Nationalist, Bhaskar Jadhav Disclosed

शिवसेनेचे सहा खासदार राष्ट्रवादीत येणार होते, भास्कर जाधव यांचा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचे सहा विद्यमान खासदार राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे निश्चित झाले होते. मात्र, काँग्रेसपासून फारकत घेऊन राष्‍ट्रवादीने स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात, अशी त्यांची मागणी होती. मात्र, राष्‍ट्रवादीने त्यास नकार दिल्याने या खासदारांनी माघार घेतली, असा गौप्यस्फोट राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सोमवारी केला.
राष्‍ट्रवादी काँग्रेस भवन येथे माध्यमांशी बोलताना जाधव म्हणाले, गेल्या वर्षभरापासून शिवसेनेचे सहा खासदार आमच्या संपर्कात होते. निवडणुकांच्या तोंडावर राष्‍ट्रÞवादीमध्ये प्रवेश करून त्यांना निवडणूक लढवायची होती. आम्ही काँग्रेसबरोबर काडीमोड घ्यावा, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, आम्ही त्यांना काँग्रेसबरोबरची आघाडी मोडणार नाही, असे बजावले. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा विचार बदलल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंचे... तोंडात नाही बळ!
‘उद्धव ठाकरे यांची अवस्था तोंडात नाही बळ, बाकी सर्व सीताफळ अशी झाली आहे. बाळासाहेबांचा एकही गुण त्यांच्यात नाही. कार्यकर्त्यांना व नेत्यांना सांभाळण्याचे कसबही त्यांच्यात नाही. कदाचित ते स्वत:बाबतीत साशंक असल्याने शिवसेनेवरील पकड सैल झाली आहे,’ अशी टीकाही जाधव यांनी केली.
‘सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवा’
शरद पवार शिरूरमध्ये उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर जाधव म्हणाले की, उद्धव यांनी आधी स्वत: निवडणूक लढवून दाखवावी. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांना सलग बोलता येत नाही. आपण बोलत असलेल्या वाक्यांना मागचा-पुढचा संदर्भ नसतो, आधी ते सुधारावे. आणि निवडणूक लढवण्याची इतकीच खुमखुमी असेल तर बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान जाधव यांनी दिले.