आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्याच्या नाट्यसंमेलनावर शिवसेनेची छाप, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद‌घाटन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ठाण्यात १९ ते २१ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी अायाेजक नाट्य परिषदेने सत्ताधारी शिवसेनेसमाेर सपशेल लाेटांगण घातल्याचाच अनुभव येत अाहे. या संमेलनाच्या उद्घाटनापासून समाराेपापर्यंत सर्वच बाबींवर शिवसेनेची छाप असल्याचे दिसून येते.

नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात नाटककार गंगाराम गवाणकर यांची निवड झाली आहे. कोकणातला हा सुपुत्र अध्यक्षस्थानी असल्याने व शिवसेनेचा सगळा राजकीय पाया हा बहुतांशी कोकणातच असल्याने या नाट्यसंमेलनाचे आयोजन धडाक्यात करून कोकणी माणसांची मने जिंकण्याची संधी शिवसेनेने साधली अाहे. पिंपरीत नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना साधे निमंत्रणही देण्यात अाले नव्हते. मात्र, अाता नाट्य संमेलनाचे उद्घाटनच उद्धव यांच्या हस्ते करून त्याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात अाहे.

संमेलननगरीला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देण्यात अाले अाहे. मात्र, ‘त्यांचे वडील व प्रख्यात समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘खरा ब्राह्मण’सारखी नाटके लिहिली आहेत. त्यांचे नाव नाट्यनगरीला का नाही?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘स्वागत समितीचा हा निर्णय अाहे,’ एवढेच उत्तर नाट्य परिषदेचे मुख्य कार्यवाह दीपक करंजीकर यांनी दिले.

या संमेलनाच्या कार्यसमितीमध्ये वसंत डावखरे (समन्वयक), खासदार राजन विचारे (अायोजक), ठाण्याचे महापौर संजय मोरे (स्वागत समिती अध्यक्ष), खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार प्रताप सरनाईक (कार्याध्यक्ष), स्वागत समितीचे उपाध्यक्ष आमदार संजय केळकर, जितेंद्र आव्हाड (उपाध्यक्ष), अामदार सुभाष भोईर (उपाध्यक्ष) अशा सर्वपक्षीय राजकारण्यांचा समावेश अाहे.

उद्घाटन साेहळ्याला दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत, रवींद्र वायकर हे शिवसेनेचे मंत्री तसेच गजानन कीर्तिकर, अनिल देसाई, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, विनायक राऊत, राहुल शेवाळे हे पक्षाचे सहा खासदार व्यासपीठावर हजर राहणार अाहेत. त्यामुळे हे संमेलन नाट्य परिषदेचे अाहे की शिवसेनेचे असा प्रश्नच अाता विचारला जाऊ लागला अाहे.
स्टेज आर्टिस्ट मुलांचा सत्कार
संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ठाण्यात संमेलनपूर्व कार्यक्रमांची रेलचेल आहे. त्यात ‘संगीत कट्यार काळजात घुसली’, ‘शेवग्याच्या शेंगा’, ‘सोबतीने चालताना’, ‘तिन्हीसांज’ अादी नाटके व तेजोमय रुक्मिणी, सप्तसूर झंकारीत बोले असे विविध कार्यक्रम हाेणार आहेत. एका मूकबधिर नाट्यासह बालनाट्येही सादर केली जातील. तसेच ४० एकपात्री कार्यक्रम सादर होतील. ज्या बॅकस्टेज आर्टिस्टच्या मुलांना दहावीत ८०% पेक्षा जास्त गुण मिळाले त्यापैकी तीन मुलांचा सत्कार तसेच नाट्य जाहिरात संस्थांच्या चालकांपैकी विजय पाध्ये, हर्षद तोंडवळकर यांचाही सत्कार होईल, असे नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर यांनी सांगितले.