आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अरबी समुद्रात उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेग आलेला आहे. जगातल्या सर्वात उंच अशा स्मारकाचे मंगळवारी राज्य सरकारतर्फे सादरीकरण (प्रझेंटेशन) करण्यात आले आहे. केंद्राकडून सर्व परवानग्या मिळाल्यानंतर या स्मारकाचे काम सुरू करण्यात येणार असून त्यानंतर फक्त अडीच वर्षात हे स्मारक पूर्ण केले जाणार आहे.
शिवस्मारकाच्या प्राथमिक खर्चासाठी नुकतीच राज्य सरकारने शंभर कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. सरकारी पातळीवर स्मारकाच्या कामांनाही आता वेग आला आहे. मुंबईचे पालकमंत्री आणि या शिवस्मारक निर्माण समितीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी या स्मारकाच्या संकल्पचित्राचे सादरीकरण केले. नरिमन पॉईंटपासून समुद्रात अडीच किमीवर पाण्याखाली असलेल्या चाळीस एकर इतक्या विस्तीर्ण खडकावर 190 मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा याची उंची दुप्पट असेल.
या प्रकल्पाचा सागरी पर्यावरणावर होणा-या संभाव्य परिणामांचा अभ्यास करण्यात आला आहे. गोव्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ओशियानोलॉजी व राष्ट्रीय पर्यावरण संस्थांनी तयार केलेला हा अभ्यास अहवाल महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने केंद्रीय पर्यावरण खात्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. तसेच आठवड्याभरापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसमोरही या प्रकल्पाच्या संकल्पचित्राचे सादरीकरण करण्यात आले. लवकरच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्यानंतर या स्मारकाचे काम सुरू होईल, असे पाटील म्हणाले.
प्रकल्पाच्या जागेचे सर्वेक्षण मुंबई आयआयटीच्या वतीने सध्या सुरू आहे. या प्रकल्पाचे संकल्पचित्र जे.जे. स्कुल ऑफ आर्टसच्या स्थापत्यशास्त्र विभागाचे प्राचार्य राजीव मिश्रा यांनी तयार केले आहे. राज्य मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी किती खर्च येईल हे आत्ताच सांगता येणे अवघड असून केंद्राच्या परवानग्या मिळाल्यानंतरच सखोल अभ्यास करून खर्चाचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.
कामाला गती मिळेल का?
राज्य सरकारतर्फे 2009 मध्ये लोकसभा निवडणुकांपूर्वी शिवस्मारकाची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर हा प्रस्ताव थंड बस्त्यात पडून होता. आता पुन्हा एकदा निवडणुकांपूर्वी या स्मारकाच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे निवडणुकांनंतर पुन्हा हा प्रकल्प नजरेआड केला जाणार नाही ना, असा सवाल शिवप्रेमींकडून विचारण्यात येतो आहे.
स्मारकाची वैशिष्ट्ये
* जगातला सर्वात उंच असा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. उंची 190 मीटर म्हणजेच 632 फूट इतकी असेल. अमेरिकेच्या स्वातंत्रदेवतेच्या पुतळ्याची उंची केवळ 309 फूट.
* शिवाजी महाराजांच्या जीवनातील घटनांची माहिती देणारे कलादालन
* वेगवेगळ्या आकाराची दोन थिएटर्स
* एक्झिबिशन सेंटर
* जगातले सर्वात मोठे समुद्र मत्स्यालय
* महाराजांचा जीवनपट आणि इतिहास उलगडणारा लेझर शो
* अतिशय आकर्षक उद्यान
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.