आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी महाराजांचा शाक्त राज्याभिषेक उत्साहात साजरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रायगड किल्ल्यावर पहिल्यांदाच छत्रपती शिवरायांच्या शाक्त राज्याभिषेकाचा सोहळा शनिवारी कोणताही वादविवाद न होता मोठ्या उत्साहात पार पडला. मराठा सेवा संघाची उपसंघटना असलेल्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने या सोहळ्याचे आयोजन केले होते. या शिवराज्याभिषेक साेहळ्यास राज्यभरातील सुमारे एक हजारपेक्षा अधिक मुस्लिम युवकांनी हजेरी लावली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील होते. छत्रपती शिवरायांनी ६ जून रोजी वैदिक राज्याभिषेक केल्यानंतरही शाक्त राज्याभिषेक केला. कर्मकांड आणि खर्चास फाटा देऊन २४ सप्टेंबर रोजी केलेला शाक्त राज्याभिषेक हाच खरा शिवराज्याभिषेक सोहळा असून बहुजन समाजाचा स्वातंत्र्य दिन आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच शिवाजीच्या नावाने राज्य चालवणारी मंडळी महाराजांच्या विचारांविरोधात काम करत असल्याची टीका पाटील यांनी या वेळी केली. महाराजांच्या सैन्यात २५ टक्के मुस्लिम होते, महाराजांचे आरमारप्रमुख तसेच महाराजांचे १३ अंगरक्षक मुस्लिम होते, असे स्पष्ट करत मराठा-मुस्लिम एेक्याने महाराष्ट्र राज्य दंगामुक्त झाले आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले.

मेघडंबरीसमोर राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या ४२ प्रवाशांना या वेळी आदरांजली वाहण्यात आली. शिवशाहिरी आणि जिजाऊ वंदना या वेळी करण्यात आली.

अमोल मिटकरी, सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, मुस्लिम ब्रिगेडचे शेख सुभान अली, जमात-ए-इस्लाम हिंदचे तौफिक अस्लम, ताहिर अली शेख आणि ‘रिपाइं’चे किरण खांबे, सत्यशोधक क्रांती दलाचे काॅ. किशोर ढमाले आणि प्रा. परदेेशी यांची भाषणे झाली.
छायाचित्र: रायगड किल्ल्यावर महाराजांचा शाक्त राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. या वेळी शिवप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...