आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधामोहन सिंह हे देशाला लाभलेले दुर्दैवी केंद्रिय कृषिमंत्री, उद्धव ठाकरे यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- "शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमप्रकरणामुळे होतात,' असे सांगणारे राधामोहन सिंह हे देशाला लाभलेले दुर्दैवी केंद्रिय कृषिमंत्री असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत केली. शेतकऱ्यांची प्रेमप्रकरणे बघण्यापेक्षा त्यांचे अश्रू पुसा, त्यांचे मातीवरील प्रेम दिसत नसेल तर त्या पदावर राहू नका, असा सल्ला त्यांनी राधामोहन सिंह यांना दिला.

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग ही शैक्षणिक सेवा उपलब्ध करून दिली असून देशातील या पहिल्या उपक्रमाचे उद््घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी झाले. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार राजन साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काही राज्यांमध्ये निवडणुका असल्याने त्यांना मोठे पॅकेज दिले जात आहे. परंतु ज्या ठिकाणी संकटाची स्थिती आहे त्या ठिकाणी पॅकेज द्यायला हवे. पॅकेज निवडणुकीसाठी नसून संकटग्रस्तांसाठी हवे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी. ही मागणी कायम असल्याचे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारला जर हे जमत नसेल तर काहीही करा; परंतु शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारवर टीका नाही
शिवसेनेच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर होत असलेल्या टीकेबद्दल विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, टीमवर्क महत्त्वाचे आहे. टीमचा कॅप्टनच डावपेच करत असतो आणि त्याचे डावपेच यशस्वी करण्याचे काम टीम करत असते. पण मी सरकारवर टीका करीत नाही, मात्र सरकारमध्ये सहभागी असल्याने जनतेच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी दिले.

कृषिमंत्र्यांंच्या पुतळ्याला सांगलीत दारूचा अभिषेक
सांगली- केंद्रिय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या ‘शेतकरी प्रेमप्रकरणातून आत्महत्या करतात,’ या वक्तव्याचा शेतकरी संघटना आणि काँग्रेसने सांगलीत जोरदार निषेध केला. शेतकरी संघटनेने राधामोहन सिंह यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला दारूचा अभिषेक घातला तर काँग्रेसने मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. राधामोहन सिंह यांनी ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कौटुंबिक कलह, जमिनींचे वाद, दारूची नशा किंवा मुला-मुलींच्या प्रेमप्रकरणातून होतात,’ असे वक्तव्य करून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत असून सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. काँग्रेसचे महापालिका क्षेत्राध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौकातून मूक मोर्चा काढून राधामोहन सिंह यांचा निषेध करण्यात आला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, ओवेसींचा नादानपणा..