आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivasena Pramukh Balasaheb Thakare Death Anniversary On The Shivaji Park

बाळासाहेबांचा स्मृतिदिन, शिवाजी पार्कवर तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाळासाहेब ठाकरे यांच्या मंगळवारी हाेणाऱ्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाची पालिकेकडून सजावट अाणि रंगरंगोटी करण्यात आली. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जय्यत तयारी केली आहे.

स्मृतिस्थळाभोवतीच्या संरक्षक जाळीची रंगरंगोटी करण्यात आली असून आतील परिसरात फुलांनी सजावट करण्यात आली आहे. स्मृतिस्थळ व सभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्मारकाच्या दर्शनास येणाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी दोन टँकर्स उपलब्ध करून दिले आहेत. शिवाजी पार्क परिसरात स्वच्छता राहावी म्हणून अतिरिक्त कामगार नेमण्यात आले आहेत.
सदरहू जागा सागरतटीय नियमन क्षेत्रात (सीआरझेड) तसेच हेरिटेजअंतर्गत येत असल्याने स्मृतिस्थळ कोणत्याही प्रकारच्या सिमेंट बांधकामाशिवाय फक्त नैसर्गिक दगड, माती, विटा, विविध फुलझाडे यांचा उपयोग करून विकसित करण्यात आले आहे. स्मृतिस्थळाचा परिसर लाल आग्रा दगडाच्या लादी, माती व हिरवळ इत्यादींनी सुशोभित करण्यात आला आहे. त्यामध्ये हिरवळीचे गालिचे व विविध १५ प्रकारची शोभिवंत फुलझाडे रोपण करून स्मृतिस्थळ सुशोभित करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पालिकेतर्फे स्मृतिस्थळ विकसित करण्यात आले आहे त्या ठिकाणी बाळासाहेबांनी षष्ट्यब्दीनिमित्त गुलमोहर झाडाचे रोपटे लावले होते, तर मीनाताई ठाकरे यांनी त्याच परिसरात बकुळीच्या वृक्षाचे रोपटे लावले होते. या दोन झाडांमधील जागेत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ आहे.
स्मृतिस्थळी अखंड ज्योत प्रज्वलन करण्यात आले आहे. संरक्षित आवरणासह ६ फूट उंचीची ही अखंड ज्योत आहे. महानगर गॅस कंपनीकडून पाइपद्वारे सदर ज्योतीला अखंड गॅसपुरवठा करण्यात येत आहे.