आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivasena Pramukh Balasaheb Thakare's Death Anniversary

शिवसेनाप्रमुखांची पुण्यतिथी, स्मारक जागेची अाज घाेषणा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तिसरी पुण्यतिथी मंगळवारी होत असताना गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता उपभोगत असलेल्या शिवसेनेला आपल्या पक्षप्रमुखांच्या स्मारकासाठी जागा मिळत नसल्याचे चित्र अाहे. मुंबईच्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाईल, असे म्हटले जात असले तरी त्या ठिकाणी कायद्याने स्मारक उभारणे शक्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, पुण्यतिथीच्या कार्यक्रमात स्मारकाच्या जागेची घाेषणा हाेण्याची शक्यता अाहे.

सोमवारी शिवसेना भवन येथे पक्षाच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत चर्चा झाल्याचे समजते. परंतु शिवसेना प्रवक्ते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी, पुण्यतिथीच्या तयारीबाबत ही बैठक होती, यात स्मारकाबाबत काहीही चर्चा झाली नाही. कोणीही काहीही बातमी पसरवतो, असे सांगत सारवासारव केली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने चार जागांचा पर्याय सीलबंद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला आहे. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री जागा निश्चित करणार आहेत. त्यामुळे मंगळवारी कदाचित जागेची घोषणा केली जाईल, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

मुंबापुरीत सध्या १२ हजारांवर पुतळे
महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, मुंबईत १२ हजार पुतळे अाहेत. रमाबाईनगर येथे ११ ऑगस्ट १९९७ मध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची आणि शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची जून २००६ मध्ये विटंबना झाल्यानंतर महापालिकेने यापुढे मुंबईत पुतळे न उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी २००० आणि २००१ मध्येही असाच निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. ज्यांना पुतळा उभारायचा आहे त्यांनी देखभाल, सुरक्षेची व्यवस्था करावी, असा निर्णय २००६ मध्ये झाला. असे असतानाही गेल्या आठवड्यात दक्षिण मुंबईत शिवसेनाप्रमुखांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय नुकताच मनपाच्या बैठकीत घेण्यात आला.

स्मारक उभारण्यात अडचणी काय ?
महापौर बंगला ही मुंबई महापालिकेच्या मालकीची वस्तू असून मुंबईचे हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सरकार वा महापालिकेत कोणतेही पद भूषवलेले नसल्याने त्यांचे स्मारक महापौर निवासात तयार करणे अशक्य आहे. एखादा राजकीय पक्ष अशा वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणाची मूळ ओळख कशी पुसू शकेल. त्यामुळे महापौर निवासाऐवजी दुसऱ्या जागेची घोषणा केली जाईल, असेही सांगितले जात आहे.

नामकरणाचा धडाका
-गेल्या तीन वर्षांत शिवसेनेच्या वतीने मुंबईतील रस्ते आणि रुग्णालयांना बाळासाहेबांचे नाव देण्याचे प्रयत्न सुरू झाले. जोगेश्वरी येथे महापालिकेने १२५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या ट्रॉमा सेंटरला बाळासाहेबांचे नाव दिले अाहे.

-लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मनपातर्फे प्रस्तावित आरोग्य विश्वविद्यालयाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी.

-वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते कुर्ला येथे जाणाऱ्या रस्त्याला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याचा राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा प्रस्ताव, मनपाने दिली मंजूरी.

-नव्या ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गाला शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र मनसेचे बाळा नांदगावकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना दिले होते.
-मुंबईच्या दहिसर आणि मुलुंड चेक नाक्यासह मुंबईत येणाऱ्या पाचही प्रवेशद्वाराला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्याची सूचना माजी महापौर दत्ता दळवी यांनी मांडला होती. पवई तलावालाही शिवसेनाप्रमुखांचे नाव द्यावे, अशी मागणीही केली जात होती.