आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना-भाजपात \'सामना\' :...तर जनता सालटी काढेल, लोकांना गृहित धरू नका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा सल्ला शिवसेनेने भाजपला 'सामना'तून दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या जागावाटपावरून भाजप सध्या भलताच आक्रमक झाला आहे. कमी जागा घेणार नाही अशी बांग भाजप देत आहे. शिवसेनेने जास्तीच्या जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर लढू, अशी तिरकी चाल भाजपने राबवत शिवसेनेवर दबाव वाढविला आहे. मात्र, त्यातवेळी देशातील 9 राज्यातील पोटनिवडणुकीचे निकाल लागले. त्यात भाजपला जबर फटका बसला. भाजपला गुजरात, राजस्थान व यूपीतील पारंपारिक जागांवर पराभवास सामोरे जावे लागले. यावरून भाजपला ठोकण्याची संधी शिवसेनेने सोडली नाही.
आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे की, बिहारच्या पोटनिवडणुकांत व आता उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या पोटनिवडणुकांत विचित्र निकाल आहेत. पोटनिवडणुकांत निम्म्यांहून अधिक जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. आश्‍चर्य असे की, परंपरेने भाजपकडे असलेल्या जागांवर कॉंग्रेस किंवा ‘सपा’ने विजय मिळवावा हे जनमनाचे गूढ म्हणावे लागेल. 11 जागांपैकी 9 समाजवादी पार्टीने तर 2 भाजपने जिंकल्या. राजस्थानातही 4 पैकी 3 जागा कॉंग्रेसने जिंकल्या व 1 जागा भाजपला मिळाली. या तिन्ही जागा भाजपने जिंकलेल्या होत्या. मोदी यांच्या गुजरातमध्ये 9 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या हे खरे, पण 3 जागा कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतल्या. हे निकाल आश्‍चर्यकारक तितकेच अनपेक्षित आहेत, असे सामनात म्हटले आहे.
या पोटनिवडणुकांच्या निकालांचे जे राजकीय पडसाद उमटायचे ते उमटतीलच, पण या निकालांमुळे ‘मोदी लाट ओसरली होऽऽ’ अशा हाकाट्या सुरू झाल्या आहेत. पोटनिवडणुकांचा व मोदी लाटेचा संबंध जोडू नये. मोदी यांच्याविरोधातील कौल असल्याची बांगही कुणी मारू नये. लोकांची मने चंचल असतात. त्याचा हा निर्णय आहे. देशाचा कारभार करण्यासाठीचा कौल जनतेने मोदी यांना दिला. लोकसभा निवडणुका वेगळ्या व राज्याच्या निवडणुका वेगळ्या हे लक्षात घेतले पाहिजे. ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळा निकाल लागला म्हणून त्याचे खापर मोदी लाटेवर फोडणे बरोबर नाही. गेल्या महिन्यातील बिहारच्या पोटनिवडणुकांत 10 पैकी 6 जागांवर नितीशकुमार, लालू व कॉंग्रेस आघाडी विजयी झाली व भाजपास 4 जागा मिळाल्या. त्यावेळीही आम्ही हेच म्हटले होते. प्रत्येक निवडणुकीची हवा वेगळी असते व प्रत्येक निकालानंतर हवा बदलत जाते. लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत व विधानसभांच्या निकालांवर जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका लढता येणार नाही, असा सल्ला मित्रपक्ष भाजपला दिला आहे.