आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : BCCI कार्यालयात शिवसेनेचा राडा, मुंबईऐवजी दिल्लीत उद्या बैठक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेचा पाकिस्तान विरोध पुन्हा एकदा जोरदारपणे उफाळून आला. आज सकाळी मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयात शेकडो शिवसैनिकांनी धूडगूस घातला. \'पाकिस्तान मुर्दाबाद\', \'शहरियार खान गो बॅक\' व \'मनोहर शशांक मुर्दाबाद\' अशी घोषणा देत शिवसैनिकांनी राडा घातला.
 
भारत-पाकिस्तान या दोन देशादरम्यान क्रिकेट संबंध पुन्हा सुरळित करण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तान क्रिकेड बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान यांना मुंबईत येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार खान रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या ते मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेल वास्तव्यास आहेत.
 
भारत-पाकिस्तान या दोन देशादरम्यान क्रिकेट संबंध पुन्हा पूर्ववत करण्याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरियार खान आणि बीसीआयआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यात आज मुंबईतील बीसीसीआयच्या कार्यालयात चर्चा होणार आहे. खान-मनोहर यांच्यात दुपारी 12 वाजता बैठक नियोजित होती. मात्र, या बैठकीआधीच शेकडो शिवसैनिक बीसीआयआयच्या कार्यालयासमोर दाखल झाले व पाकविरोधात घोषणा देत कार्यालयात घुसले. यावेळी आमच्या जवानांना, नागरिकांना मारणा-या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्याचे काहीच कारण नाही. पाकिस्तानींना भारतात प्रवेश देता कामा नये असे सांगत कार्यालयातच जोरदार निदर्शने सुरु केली. 
 
यावेळी पोलिसांचा फौजफाटा नसल्याने शिवसैनिकांनी कार्यालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, शिवसैनिकांनी धूडगुस घालत असल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तेथे धाव घेतली व शिवसैनिकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काहींना चोप दिला गेला. यात काही शिवसैनिक पळून जाण्यात यशस्वी झाले तर 100 हून अधिक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना अटक करण्यात आली असून, बीसीसीआय परिसरातून सर्व शिवसैनिकांना हूसकून लावण्यात यश आले आहे. सध्या बीसीसीआयच्या कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा फौजफाटा असून, तेथे कडेकोट सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
 
दरम्यान, शशांक मनोहर आणि शहरियार खान यांच्यातील आजची नियोजित बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक मुंबईऐवजी दिल्ली किंवा कोलकात्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे दोन देशादरम्यान क्रिकेट संबंध सुरळित करण्याची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलण्यात आली आहे.
 
बीसीसीआयचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांनी शिवसेनेच्या राड्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. क्रिकेट हा सज्जनांचा खेळ आहे. तो त्याच प्रमाणे पुढे गेला आहे. शिवसेनेचे कृत्य माफ करण्यासारखे नाही. उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की, बस आता, शिवसैनिकांना आवरा. बीसीसीआय ही एक जबाबदार बॉडी आहे. ते देशाच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाही. क्रिकेटशी संबंधित निर्णय आता बीसीसीआयला घेऊ द्या.
 
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती संपूर्णपणे ढासळली आहे. गुलाम अली, कसुरी आणि आता शहरियार खान यांना तुम्ही कशी वागणूक देत आहात? असा सवाल काँग्रेसचे नेते मनिष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. तर, लोकशाहीने तुम्हाला विरोध, निदर्शने करण्याचा अधिकार दिला असला तरी कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार दिलेला नाही अशी टीका शिवसेनेच्या हल्ल्यानंतर काँग्रेसने केली आहे.
 
शिवसेनेच्या या राडेबाजीवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीत हिंसेला कसलेही स्थान नाही. दुस-यांची मते न ऐकता आपले म्हणणे रेटण्यालाही लोकशाहीत बिलकूल स्थान नाही. विरोध स्वीकार्य असला तरी हिंसा चालणार नाही, असे मत भाजपचे नेते मुख्तार अली नक्वी यांनी मांडले आहे.
 
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, शिवसैनिकांनी कसा घातला धूडगूस....