मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांवर निष्ठा ठेवत शिवसैनिक आज शिवसेनेचा 48 वा वर्धापनदिन वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात दणक्यात साजरा करणार आहेत. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. आजच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची शक्यता आहे.
दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकल्यानंतर आता महाराष्ट्रात विधान भवनावर भगवे तोरण बांधण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. मुंबईतील रंगशारदा सभागृहात बुधवारपासून शिवसेनेचे राज्यव्यापी शिबीर सुरू झाले असून त्याचा समारोपही आज सायंकाळी सांगता होईल. आज सकाळपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. सायंकाळी 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पदाधिकार्यांना मार्गदर्शन करतील. यावेळी शिवसेनेचे नेते, उपनेते, आमदार, खासदार, जिल्हा संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, महिला जिल्हा संघटक, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य तसेच मुंबई-ठाण्यातील विभागप्रमुख, उपविभागप्रमुख व युवा सेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या यूपीए सरकारची धुळधाण झाली. देशात एनडीएचे सरकार आले. महाराष्ट्रात शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. आता विधानसभेचीही निवडणूक तोंडावर आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस आघाडीचे भ्रष्ट सरकार उलथून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे तमाम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. यावेळी शिवसैनिकांचा कल पाहून उद्धव ठाकरे निर्णय घेतील. मात्र, उद्धव ठाकरेंच्या नावाची आज अधिकृत घोषणा होते की नाही याकडे सर्व राजकीय पंडितांचे लक्ष लागले आहे.
पुढे वाचा, गावागावात शाखा आणि घराघरात शिवसेना पोहोचवण्याचा मंत्र...
शिवसैनिकांनो 155 आमदारांचे टार्गेट ठेवा- रावते
शिवसेनेला पुन्हा नंबर वन करा- मनोहर जोशी