आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Accept Nitish Way; Leaders Disappointed

..तर शिवसेनेचा ‘नितीश’मार्ग; भाजपच्या मनसेशी जवळिकीवर नेत्यांमध्ये तीव्र नाराजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सातत्याने काही ना काही कारण काढून शिवसेना-भाजप युतीत मनसेनेही सहभागी व्हावे, अशी जाहीर इच्छा व्यक्त करणारे भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शिवसेनेमध्ये तीव्र नाराजी आहे. विरोधानंतरही भाजपने हीच भूमिका कायम ठेवली तर आम्हालाही ‘नितीश’मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून खासगीत दिला जात आहे.


‘शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था व नाराजी पसरवण्यासाठी भाजप हे जाणीवपूर्वक करत आहे. ‘रालोआ’तून जदयूसारखा महत्त्वाचा साथीदार सोडून गेल्यानंतरही भाजपला शहाणपण आले नसेल, तर वर्षभरानंतरच्या निवडणुकीत त्यांचे भले होवो, इतकीच इच्छा प्रदर्शित करणे आपल्या हातात राहते,’ असे शिवसेनेतील एका नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.


‘मनसेला लोकसभेसाठी दक्षिण मध्य (दादर), उत्तर मुंबई (सध्या संजय निरुपम खासदार असलेली), कल्याण-डोंबिवली, पुणे व नाशिक या पाच जागा हव्या आहेत. यातील तीन जागा शिवसेनेच्या कोट्यातील असून, त्या मनसेला का सोडाव्यात?’ असा सवालही शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेत्याने केला.


जागा सोडायच्या कुणी?.
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, मनसेसाठी लोकसभेला तीन जागा सोडणेही कठीण आहे. मात्र, त्यांना जागा सोडण्याबाबतचा खरा प्रश्न उपस्थित होईल तो विधानसभेच्या वेळी. मनसे 50 ते 60 जागांपेक्षा कमी जागा पदरात पाडून घेण्यास तयार होणार नाही. या जागा नेमक्या सोडायच्या कोणी? भाजपला मनसेची स्वप्ने पडत असल्यास त्यांनी जागा सोडण्याची तयारी दाखवावी, अन्यथा शिवसेनेच्या व पर्यायाने भाजपच्याही कार्यकर्त्यांच्या मनात अशा प्रकारचा संभ्रम तयार करणे हे निवडणुकीच्या राजकारणाच्या दृष्टीने आतबट्ट्याचा व्यवहार आहे.


...अन्यथा वेगळा निर्णय
एकंदर फडणवीसांच्या सातत्याने मनसेचा जप करण्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये कारण नसताना दरी वाढवण्याचेच काम होत असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. असेच सुरू राहिल्यास याबाबत भाजपच्या केंद्रातील नेत्यांचे मत आजमावले जाईल व त्यानंतर शिवसेना मोठा निर्णय घेण्यासाठी मोकळी असेल, असेही एका शिवसेना नेत्याने म्हटले आहे.


मोदींकडून महाराष्ट्र भाजपला धडे
भाजपचे निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी 27 जून रोजी मुंबईत येणार आहेत. यावेळी त भाजपच्या कोअर कमिटीच्या नेत्यांची विशेष बैठक घेतील. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील परिस्थिती, भाजपचा अजेंडा, प्रचाराचे विषय अशा विविध मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत.


राजबाबत चर्चेची अपेक्षा
महायुतीत मनसेला घेण्याबाबत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत, तसेच मोदी व राज ठाकरेंची जवळीकही सर्वश्रूत आहे. त्यामुळे 27 जून रोजी मुंबईत मोदींसोबत होणा-या बैठकीत फडणवीस मनसेचा मुद्दा उपस्थित करतील, असे अंदाज आहे. त्यावर मोदी व पक्षाचे राज्यातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


‘खिचडी’चा प्रयोग नकोच : राऊत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत याबाबत म्हणाले की, ‘शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच येणा-या निवडणुकांना सामोरी जाईल. दिल्लीतील भाजप नेत्यांचेही हेच म्हणणे आहे. राजकारणात अनेक पक्षांच्या खिचडीचा फारसा फायदा होत नसतो हे सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्रात याआधी पुलोदचा प्रयोग झाला. त्यामुळे महायुतीत आणखी कोणाला घ्यायचे असल्यास त्याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेऊ शकतात. इतर कोणत्याही पक्षांच्या भूमिका काय, यावर शिवसेनेच्या भूमिका ठरत नसतात.’