मुंबई- अखंड महाराष्ट्राचे लचके तोडून काही जण वेगळ्या विदर्भाचे स्वप्न पाहत आहेत. पण शिवसेना त्यांचे स्वप्न कदापी पूर्ण होऊ देणार नाही, असे सांगत शिवसेनेने स्वतंत्र विदर्भाविरोधात एल्गार पुकारत भाजपला फटकारले आहे. काँग्रेसने हुतात्मा स्मारकास अभिवादन करून प्रचाराचे रणसिंग फुकले आहे. अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार काँग्रेसने केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अशा शब्दात काँग्रेसच्या भूमिकेचे सेनेने 'सामना'तून कौतुक केले आहे.
सामनाच्या अग्रलेखातून आज शिवसेनेने स्वतंत्र विदर्भाबाबत आग्रही असलेल्या भाजपवर हल्लाबोल केला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, काँग्रेसने प्रचाराचे रणशिंग हुतात्मा स्मारकास अभिवादन करून फुंकले. अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार काँग्रेसने केला. महाराष्ट्राचे विभाजन करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला. त्याबद्दल आम्ही काँग्रेस व अशोक चव्हाण यांचे अभिनंदन करतो. भाजप असो किंवा अन्य कुणी, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचे स्वप्न कुणी पाहत असेल तर आम्ही ते पूर्ण होऊ देणार नाही, असे अग्रलेखात म्हटले आहे.