आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Aggresive Over Pakistan Issue, Criticise On Modi Govt, Policy

आपला 1 जवान शहीद झाल्यास पाकचे 10 सैनिक मारा; चर्चा नव्हे, धडा शिकवा- शिवसेना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्धव ठाकरे)
मुंबई- जम्मूमधील अखनूरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला तर दोन जवान जखमी झाले. या घटनेचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. मोदी सरकारने आता गप्प बसू नये. कणखर भूमिका घ्यावी आणि पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवावा, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पण पाकिस्तान मात्र भारतीय सीमेवर गोळीबार करून आपल्या जवानांचे प्राण घेत आहे. सरकारने यावर काय कारवाई केली. पाकिस्तानच्या या उद्दामपणाला चोख प्रत्त्युत्तर देण्याची वेळ आली असून मोदी सरकारने कठोर पावले उचलावीत असे शिवसेनेने म्हटले आहे.
शस्त्रसंधीचे रोज उल्लंघन करणार्‍या पाकिस्तानशी चर्चा नको, तर जोरदार उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तानने आपला एक जवान मारला, तर त्यांचे दहा सैनिक मारा. पाकिस्तानला अद्दल घडवा असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तुम्ही आमचा एक मारला, तर आम्ही तुमचे शंभर मारू, हा इस्त्राईल देशाचा खाक्या आहे. युद्धात कोणाचीही बाजू न घेण्याची भारत सरकारची भूमिका योग्यच आहे, पण शत्रूच्या ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देण्याचा इस्त्राईलचा गुण मात्र नक्कीच घेण्यासारखा आहे, असा टोलाही शिवसेनेने मोदी सरकारला हाणला आहे.
मोदींच्या धोरणांवर टीका करताना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे की, साडी आणि शॉल डिप्लोम्सी काय आहे? पाकिस्तानबरोबर चर्चा करू नये, ही शिवसेनेची भूमिका काल होती आणि आजही आहे. आम्ही या भुमिकेवर ठाम आहोत. आपण पाकिस्तानशी चर्चा करणार आणि ते आपले जवान मारणार. मग काय आपण फक्त शहीद जवानांची संख्या मोजणार आहोत का? पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे. चर्चेने काहीही साध्य होणार नाही. पाकिस्तानला अद्दल घडविली पाहिजे. आपला एक जवान मारला तर पाकिस्तानचे दहा सैनिक मारले पाहिजेत, असे खासदार संजय राऊत यांनी सांगत पाकिस्तानवरून सेनेने भाजपविरोधी भूमिका घेतली आहे.