आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसऱ्यापूर्वी कर्जमाफीसाठी शिवसेनेचे मोर्चे; शेतकऱ्यांची थट्टा केला जात असल्याचा केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दसऱ्यापूर्वी शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शिवसेनेने आज मराठवाड्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले. कर्जमाफीच्या घोषणेला 3 महिने झाले, तरीही अटी आणि शर्थीतच कर्जमाफी अडकली आहे. त्यामुळे दसऱ्यापूर्वी कर्जमाफीची पूर्तता करा, अशी मागणी शिवसेनेने केली.

 औरंगाबादला विभागीय आयुक्त् कार्यालयावर मोर्चा
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त् कार्यालयावर शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते आणि शेतकरी सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरुन घेताना अडचणी आल्या, तरीही या अडचणीत शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने फॉर्म भरले. आता सरकारकडून तारखांवर तारखा दिल्या जात असल्याने,  कर्जमाफी कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. म्हणून दसऱ्यापूर्वी ही कर्जमाफी सरकारने करावी अशी मागणी शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.
 
वाशिममध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
वाशिममध्ये शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, त्याच मोर्चाच्या अगदी काही अंतरावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा दुसरा मोर्चा निघाल्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली. शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी कर्जमुक्त करा, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके अल्प पावसामुळे नष्ट झाली असून, या पिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी, पीकविमा आणि कर्जमुक्ती अर्जाची तारीख वाढवून देण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या.
 
चंद्रपुरात धरणे
चंद्रपुरात शिवसेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारने कर्जमाफीची केवळ घोषणा केली, मात्र अजून शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील 1 लाख 90 हजार शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र असूनही अजून हजारो शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म भरुन झालेले नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी अजून किती काळ लांबणार, असा सवाल करत दसऱ्यापूर्वी कर्जमाफी द्यावी अशी मागणी शिवसेनेने सरकारकडे केली आहे.
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...