आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर असताना CM फडणवीस यांनी केला भ्रष्टाचार -परब, शिवसेनेची नवी खेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक करू, असा शब्द देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे महापौर असताना आर्थिक घोटाळा केला अाहे. नंदलाल समितीनेही त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. आर्थिक घोटाळे करणारे फडणवीस शिवसेनेच्या पारदर्शक कारभारावर बोलतात आणि शिवसेनेवरच बेछूट, बेताल आरोप करतात,’ अशी टीका शिवसेना नेते अामदार अनिल परब यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, शिवसेना- भाजपत अाराेप- प्रत्याराेपांच्या फैरी झडत असताना शिवसेनेने अाता थेट मुख्यमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून प्रचाराची नवी खेळी पुढे केली आहे.   

परब यांनी अाराेपांच्या पुष्टीखातर २००१ मध्ये नंदलाल समितीचा अहवाल पत्रकारांना दाखवला. ‘नागपूर पालिकेत रस्ते कंत्राट देताना तत्कालीन महापौर देवेंद्र फडणवीस यांनी अनियमितता केली. नागपूरमध्ये जे घोटाळे झाले त्यामागे फडणवीसच असल्याचे नंदलाल अहवालात सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे, तर समितीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली असतानाही त्यांच्यावर कारवाई झाली नाही,’ अशी माहिती देताना ही कारवाई का झाली नाही ते उघड हाेणे अावश्यक असल्याचेही  अामदार परब म्हणाले.  
 
नंदलाल समितीने नागपुरातील ९९ नगरसेवकांसह काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची शिफारस केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी गुन्हे दाखल केल्याची माहिती देऊन नगरसेवक, अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्याचेही विधिमंडळात सांगितले हाेेत, याकडे परब यांनी लक्ष वेधले. नागपूर मनपात आताही भ्रष्टाचार होत असून त्याची माहिती मी आयुक्तांकडे मागितली आहे, परंतु त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात मी मनपा अायुक्तांविराेधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
निवडणुकीच्या निकालानंतरच ठरेल भाजप सरकारचे भवितव्य, संजय राऊत यांचा भाजपला इशारा  
‘राज्य सरकार शिवसेनेच्या नोटीस पिरियडवर आहेच. २६ जानेवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर हा पिरियड सुरू झाला आहे. आता २३ फेब्रुवारीला निकालानंतरच सरकारची मुदत स्पष्ट होईल’, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात बोलताना दिला. शिवसेनेने युती तोडण्याची घोषणा करून धरणीकंप केलेलाच आहे. भविष्यातही शिवसेना-भाजपमधील तलवारी म्यान होण्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले.  
  
‘मुंबईवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अाधी ‘आपले घर’ सांभाळले पाहिजे. वाढत्या गुन्हेगारीचे स्वरूप पाहता नागपूरची अवस्था बिहारमधील पाटणापेक्षाही वाईट झाली अाहे. नितीशकुमारांमुळे पाटणा शहरातील स्थितीही सुधारली आहे, पण नागपुरात काय? नागपूरचे शिकागो झालेय. उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात रोज खून, मारामाऱ्या आणि बलात्कार होत आहेत. लोक गुन्हेगारीच्या विरोधात रस्त्यावर उतरू लागले आहेत. नागपूर हे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांचे शहर आहे. गडकरींसारख्या नेत्यांची पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. संघाचे प्रमुख भागवत नागपुरात राहतात. त्यामुळे हे शहर चकचकीत असायला हवे, कायदा-सुव्यवस्था नांदायला हवी’, असा टाेला राऊत यांनी लगावला. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ जरी उतरले तरी मुंबईत शिवसेनाच सत्तेवर राहील, असा दावा त्यांनी केला.

‘शतप्रतिशत शिवसेना’: अाता राज्यात ‘शतप्रतिशत शिवसेना’ हे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी येत्या काळात विदर्भावर फोकस केला जाणार आहे. युतीमुळे विदर्भात अाजवर शिवसेनेचे नुकसान झाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ५० जागांचे लक्ष्य असून त्यासाठी मतदारसंघ निवडून संघटना मजबूत करणार आहोत, असे खासदार राऊत यांनी सांगितले.    

वैद्यांनी भाजपला सल्ला द्यावा : शिवसेनेला सल्ला देणारे संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी त्यांच्या पक्षाला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. भाजप गुंडांचा पक्ष झाला आहे. संघाला हे चालते काय? असा प्रश्नही त्यांनी केला.

तेव्हा नागपूर मनपाची चाैकशी हे काँग्रेसचे षडयंत्र: मुख्यमंत्री
‘काँग्रेस सरकारने त्याकाळी नागपूर महापालिकेत समिती नेमून अामच्या बदनामीचा कट रचला हाेता. मात्र उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आमचे म्हणणे मान्य केले,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराबाबत शिवसेना अामदार अनिल परब यांनी केलेल्या अाराेपाचे खंडन केले. तसेच ‘जो काच के घर में रहते, वों दुसरे कें घर पे पत्थर नहीं फेका करते,’ असा ‘प्रेमळ’ सल्लाही शिवसेनेला दिला. नागपूर महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारात तत्कालिन महापाैर फडणवीस हेही सहभागी हाेते, असा अाराेप परब यांनी केला हाेता. 

मुंबईतील सभेत त्याचे खंडन करताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कारभाराचाच समाचार घेतला. ‘मध्य वैतरणा प्रकल्पाचे काम करताना ८०% किंमत कशी वाढली?’ असा प्रश्न करतानाच ‘भ्रष्टाचाराबाबत मी जेव्हा जेव्हा बोलतो, तेव्हा गप्प का राहता? मुंबई महापालिकेतील सात वर्षाचे ऑडिट केव्हा देणार?’ अशा प्रश्नांची सरबत्तीच फडणवीस यांनी केली. खंबाटा कंपनीत मराठी कामगारांची शिवसेनेेने फसवणूक केली. त्यांच्या २२ शाखाप्रमुखांना आणि कुणाच्या घरच्यांना खंबाटांकडून वेतन मिळते?’ असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...