आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुरे झाले अाराेप-प्रत्याराेप, यापुढे टीकाटिप्पणी नकाे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार किरीट सोमय्या आणि आमदार आशिष शेलार शिवसेनेवर सडकून टीका करत असताना शिवसेनेकडूनही त्यांना तितकेच ‘चाेख’ प्रत्युत्तर दिले जात अाहे. सत्तेतील मित्रपक्षांमध्ये रंगलेल्या या द्वंद्वामुळे राज्यातील जनतेची मात्र चांगलीच करमणूक हाेत अाहे. याबाबत उशिरा का हाेईना जाणीव झाल्याने अाता एकमेकांवर टीका न करण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.
भाजपचे खासदार किरीट साेमय्या यांनी शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिकेतील माफियाराज संपवणार, अशी घोषणा करून स्वबळावर लढण्याची घाेषणा केली हाेती. इतकेच नव्हे तर पालिकेतील माफियारूपी रावणाची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्नही दसऱ्याच्या दिवशी केला हाेता. मात्र शिवसैनिकांनी ताे उधळून लावला हाेता. या वेळी दाेन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत हाणामारीही झाली. त्यावर भाजप अामदार शेलार यांनी शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही बुधवारीच दिला हाेता. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वादावर चर्चा झाल्याची माहिती अाहे. राज्यात चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून यापुढे एकमेकांवर टीका न करण्याचा निर्णयही या वेळी ज्येष्ठ मंत्र्यांनी घेतला, अशी माहिती संबंधित मंत्र्याने दिली. ‘भाजपचे खासदार किरीट साेमय्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेवर केलेली टीका ही महापालिका निवडणुकीपूर्वीची राजकीय खेळी हाेती का?’ या प्रश्नावर मात्र संबंधित मंत्र्याने नकारार्थी उत्तर दिले. ती पक्षाची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवरा-बायकाेत भांडणे तर व्हायचीच..!
‘किरीट साेमय्या भ्रष्टाचाराबद्दल नेहमीच बोलत असतात. यापूर्वीही शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये अनेकदा वाद झाले. शिवसेनेच्या मुखपत्रातून आमच्यावर नेहमी टीका केली जाते. यापूर्वीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका न करण्याचा निर्णय घेतला हाेता. नवरा-बायकाेतील भांडण एकदा संपल्यानंतर ते पुन्हा हाेतच नाही असे नाही. आम्ही नक्कीच त्यातून मार्ग काढू. मात्र अाम्ही एकमेकांविराेधात अाहाेत असा याचा अर्थ काढू नये’, असेही भाजपच्ये एका ज्येष्ठ मंत्र्याने स्पष्ट केले. मुंबई मनपा निवडणुकीत युतीबाबत अद्याप काेणताच निर्णय झाला नसल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...