आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीवरून शिवसेनेचे राजकारण; डॅमेज कंट्रोलसाठी भाजप मैदानात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटबंदीचा राजकीय लाभ भाजपला होत असल्याचे पाहून परदेश दौऱ्यावरून परतलेल्या उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या निर्णयाची यथेच्छ धुलाई केली. स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राइक कधी करणार? असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा शिवसैनिकांत योग्य तो संदेश गेला. यातूनच शिवसेना आणि भाजपचे जनतेला “पाणी पाजण्याचे’ प्रेम उफाळून आले होते. भाजपनेही डॅमेज कंट्रोलसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. भाजपचा प्रभाव असलेल्या भागात कार्यकर्त्यांनी एटीएम व बँकेत पैसे घेण्यासाठी किंवा भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभ्या असलेल्या लोकांची पेयजल देऊन अशीच सेवा केली.

पाचशे आणि हजारांच्या नोटा बंद झाल्यानंतर बँका व एटीएमवर लोकांची एकच गर्दी उसळली. याचा राजकीय लाभ घेण्यासाठी मुंबई आणि ठाण्याच्या शिवसैनिकांनी सुमारे शंभराहून अधिक ठिकाणी बँक आणि एटीएमवर रांगेत ताटकळत थांबलेल्या लोकांना पिण्याचे पाणी देऊन त्यांच्याकडून सहानुभूती मिळवली, तर भाजप कार्यकर्त्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी त्यांचा प्रभाव असलेल्या भागात असाच उपक्रम राबवला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर संजय मोरे यांच्यासमवेत जिल्ह्यातील बँकांची पाहणी केली. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लाेकांच्या अडचणी जाणून घेतल्या. सेेनेच्या दोन्ही नेत्यांनी वृद्धांना आणि महिलांना तसेच दिव्यांगांना स्वतंत्र काउंटर उघडण्याचे बँक अधिकाऱ्यांना आदेश दिले. शिवसेनेच्या वतीने रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले, तर भाजपने बोरिवली, दहिसर, विलेपार्लेसह अनेक भागांत असे सामाजिक उपक्रम राबवले. मुंबईत फेब्रुवारी महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेत आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी सेना आणि भाजपच्या लोकांनी गाजावाजा करत राजकीय लाभ पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.

महापालिका निवडणुकीवरून तणातणी
फेब्रुवारी महिन्यात बृहन्मुंबई महापालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुकांत आपलेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचा आटापिटा चालू आहे. सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेने मुंबईतील मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी नोटबंदीवरून निवडणुकीचा रागरंग पाहता राजकारण सुरू केले आहे.
बातम्या आणखी आहेत...