मुंबई - काेल्हापुरातील महालक्ष्मी देवस्थानच्या ‘मनकर्णिका कुंडा’वर बेकायदेशीरपणे शौचालय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने बांधले अाहे. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या अाहेत. शासनाने तातडीने या प्रकरणी दखल घेऊन सर्व दोषींवर कारवाई करून फाैजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच १५ एप्रिलपर्यंत हे शाैचालय पाडून टाकावे, अन्यथा शिवसैनिक ‘कारसेवा’ करून ते पाडतील असा इशारा काेल्हापूरचे शिवसेना अामदार राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी दिला.
शाैचालय पाडण्याच्या मागणीसाठी शिवसेना- भाजपच्या अामदारांनी मंगळवारी विधिमंडळाच्या पायऱ्यावर अांदेालन केले. यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, गुलाबराव पाटील, भरतशेठ गोगावले, अर्जुन खोतकर, सत्यजित पाटील तर भाजपचे नरेंद्र पवार, प्रशांतशेठ ठाकूर व शिवाजीराव कर्डिले आदी सहभागी झाले होते. ‘भाजपसुद्धा कारसेवा करून ते शौचालय पाडून टाकेल’, असा इशारा कल्याण येथील आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.