आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्रिपदावर सेना नरमली, उद्धव म्हणाले, निवडणूक लढवण्याचे अजून ठरवले नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुख्यमंत्रिपदावरून भाजप-शिवसेनेत कलगीतुरा रंगला असताना आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील, असे दावे करून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी या वादात तेल ओतले होते. परंतु मुख्यमंत्रिपदाचा निर्णय महायुतीच्या बैठकीतच घेतला जाईल, अशी नरमाईची भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वादावर तूर्तास पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या 48 व्या वर्धापन दिनानिमित्त पदाधिकार्‍यांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात साजरा करण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव यांनी वरील भूमिका जाहीर केली. शिवसेनेच्या बैठकीनंतर ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष होते.

ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी बुधवारी तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, अशी वक्तव्ये केली होती. त्यांच्या या वक्तव्याने भाजपसह महायुतीच्या गोटात अस्वस्थता होती. मात्र ठाकरे यांच्या भूमिकेमुळे ज्याचे सर्वाधिक आमदार त्याचा मुख्यमंत्री या तत्त्वाशी आता शिवसेनाही सहमत झाल्याचे दिसते. उद्धव यांनी यावेळी बोलताना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली. आज ते हवे होते. आम्ही राज्यभर मेळावे घेणार होतो, परंतु मुंडेंच्या अपघाती निधनामुळे ते स्थगित करावे लागल्याचे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांसाठी महिनाभराचा संघटनात्मक कार्यक्रम त्यांना दिला. सध्या मुंबईपुरता वचननामा सादर केला आहे. राज्यासाठी लवकरच वचननामा तयार केला जाईल.

निवडणूक लढवण्याचे अजून ठरवले नाही : मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही तयार आहात का विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, मी माझा नव्हे तर महाराष्ट्राचा चेहरा चांगला आणि समृद्ध व्हावा म्हणून प्रयत्न करणार आहे. मी व्यक्तिगत स्वप्ने घेऊन जगणारा नाही, मी बाळासाहेबांची स्वपे्न साकार करण्याचे स्वप्न पाहत आहे. उद्धव यांना मुख्यमंत्रिपदाबाबत वारंवार प्रश्न विचारले असता याबाबत मी माझे मत स्पष्ट केले आहे, तुम्हाला हवे ते उत्तर देणार नाही. निवडणूक लढवायची की नाही याचा मी अजून विचार केलेला नाही. भाजपने शिवसेनेकडे जास्त जागांची मागणी केली असल्याबाबत विचारता उद्धव ठाकरे यांनी बातम्यांवर जाऊ नका. भाजपच्या कुठल्याही नेत्याने माझ्याकडे तशी मागणी केलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पुढील स्लाइडमध्ये, ही बाळासाहेबांची इच्छा..