आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Attack On Ncp Chief Sharad Pawar\'s Stand On Aamir Khan Statement

तर पवारांनी अमिरला \'निशाण-ए-बारामती\' पुरस्कार द्यावा- शिवसेनेची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्राच्या मातीतून बेइमानांचे समर्थन करणारे ‘कण्हणे’ ऐकू येत असेल तर ते मर्द मर्‍हाटी बाण्यास शोभणारे नाही. ज्या देशाचे खायचे त्या देशावरच टांग वर करायची यालाच सहिष्णुता म्हणायचे हे पवारांचे सांगणे असेल तर आमीर खानला बारामतीत बोलावून त्यास त्यांनी ‘निशाण-ए-बारामती’ पुरस्काराने सन्मानित करावे. बेइमानांची पाठराखण हीच काय सहिष्णुता? उद्या दाऊद इब्राहिमची मागणी करणे व पाकिस्तानविरोधात आवाज उठवणेही त्यांच्या दृष्टीने असहिष्णू ठरेल, अशा शब्दांत शिवसेनेने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
शरद पवार यांनी बुधवारी अमिर खानच्या असहिष्णू वक्तव्याचे समर्थन केले होते. त्यावर शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'त अग्रलेख लिहून पवारांवर हल्लाबोल केला आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की,सिनेसृष्टीतील खानमंडळींना अधूनमधून देश सोडण्याची उबळ येते तसा काही राजकारण्यांनाही खानांना पाठिंबा देण्याचा डांग्या खोकला होत असतो. महाराष्ट्राचे आदरणीय वगैरे असलेले नेते शरद पवार यांनाही कराड मुक्कामी अशाच डांग्या खोकल्याची उबळ आली व त्यांनी आमीर खानच्या ‘देशद्रोही’ वक्तव्यास विरोध करणार्‍यांनाच ‘असहिष्णू’ ठरवून टाकले. शरद पवारांनी याप्रश्‍नी फक्त 12 तासांत या बोटावरील थुंकी त्या बोटावर केली. अर्थात हे त्यांच्या स्वभावास धरूनच झाले. सातार्‍यात काल त्यांना विचारण्यात आले, ‘‘काय हो पवारसाहेब, आमीर खानने असहिष्णुतेच्या प्रश्‍नावर देश सोडण्याचा विचार व्यक्त केला यावर आपले काय म्हणणे आहे?’’ यावर शरदरावांनी अत्यंत संयमाने सांगितले, ‘‘काय घेऊन बसलात त्या आमीर खानचे. हुतात्मा कर्नल महाडिक व त्यांच्या कुटुंबीयांचा विषय त्यापेक्षा महत्त्वाचा आहे!’’ या उत्तराने त्यांचे विरोधकही चक्रावले. पण पुढच्या 12 तासांत ‘तो मी नव्हेच’ या भूमिकेत शिरून पवारांनी आमीर खानवर टीका करणार्‍यांनाच असहिष्णू ठरवले. पवारांनी कधी काय बोलावे व कशा टोप्या फिरवाव्यात हा त्यांचा प्रश्‍न, पण या देशातील एक अभिनेता खाल्या मिठास न जागता देश सोडून जाण्याची भाषा निर्लज्जपणे करतो हा जसा अपराध त्यापेक्षा मोठा अपराध आमीर खानसारख्याचे समर्थन करणे हा आहे, असा आरोप शिवसेनेने पवारांवर केला.
पुढे आणखी वाचा, पवारांवर कोणत्या शब्दांत टीका केली आहे शिवसेनेने 'सामना'त...