मुंबई- महायुतीतील जागावाटपाचा तिढा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असताना भाजपने घेतलेल्या आडमुठी भूमिकेबाबत शिवसेनेने भाजपला आज पुन्हा सामनातून लक्ष्य केले. शिवसेना-भाजप युतीचे राज्य आणायचेच आहे. मात्र सध्या उधळत असलेल्या घोड्यांचा वेग किती का असेना, जोपर्यंत ते जमिनीवरून चालत नाहीत तोपर्यंत त्यांचा काडीचाही उपयोग नाही, अशा शब्दात भाजपच्या सत्तालालसेवर भाष्य केले आहे. कोडे सुटत नाही तोपर्यंत माणसाने कुत्र्यास चावावे यासाठी माध्यमांतून शर्थ केली जाईल, असे सांगताच माणसाने माणसासारखे वागावे असे म्हणत समझनेवालों को इशारा काफी है, असे भाजप व माध्यमांना फटकारले आहे.
आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेना-भाजप युतीपुढे अकारण प्रश्नचिन्ह टाकून आधीच्या गोंधळात जास्तच भर टाकली आहे. शिवसेना-भाजप युती ही गेल्या पंचवीस वर्षांपासून आहे. त्यामुळे ‘युती’ राहिली व टिकली तर बातमी कसली? युती तुटली तरच बातमी. त्यामुळे ती तोडायचीच असे डोहाळे जेवण काही मंडळींनी घातले आहे. जॉन बोगार्ट नावाच्या एका माणसाने सांगून ठेवले आहे, ‘कुत्रा माणसाला चावतो ही बातमी नव्हे. कारण हे तर नेहमी घडत असते, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती खरी बातमी होते.’ त्यामुळे सनसनाटी व खळबळजनक घडावे आणि माणसाने कुत्र्याचा चावा घ्यावा इथपर्यंत वातावरण निर्माण करण्याच्या खटपटी लटपटी हल्ली मीडियावालेही करीत असतात. माणसानेच कुत्र्याचा चावा घ्यावा असे वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा पुरेपूर प्रयत्न होत आहे. जो तो
आपापल्या पद्धतीने ‘खात्रीलायक सूत्राकडून’ असे हवाले देत दडपून बातम्या देत आहे. शिवसेनाप्रमुख हे पत्रकार होते. त्यांनी अनेकदा सांगितले होते की, ‘प्रश्नचिन्हांकित पत्रकारिता करू नका!’ बातमी आहे ना, मग दणक्यात द्या. बातमीसमोर प्रश्नचिन्ह कसले टाकता? असे सांगत युती तुटावी यासाठी माध्यमे हातभार लावत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
मात्र, भाजपला सल्ला देताना यात म्हटले आहे की, शिवसेना-भाजपमध्ये दोन्ही माणसेच आहेत. त्यामुळे येथे कुत्रा माणसाला चावल्याची बातमी मिळणे जरा कठीणच आहे. महाराष्ट्रातला माहोल चांगला आहे व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेचरांना आता राज्यात काडीचीही किंमत उरलेली नाही. शिवसेना-भाजप युतीचे घोडे आता असे उधळले आहेत की त्यास अडवणे कुणाही दुश्मनास शक्य नाही. राज्य आणायचेच हे सगळ्यांचेच मनोरथ आहे. अर्थात मनोरथांना जोडलेल्या घोड्यांचा वेग किती का असेना, जोपर्यंत ते जमिनीवरून चालत नाहीत तोपर्यंत त्यांचा काडीचाही उपयोग नाही. आयुष्यात ज्याप्रमाणे अवघड गणिते सोडवायची असतात त्याप्रमाणे राजकारणातही ती सोडवावी लागतात. आधी उत्तर काढून जे सोडविले जाते ते गणित नसून कोडे असते. महाराष्ट्राला पडलेले कोडे लवकर सुटावे ही आई जगदंबेची इच्छा आहे. कोडे सुटत नाही तोपर्यंत माणसाने कुत्र्यास चावावे यासाठी शर्थ केली जाईल. माणसाने माणसासारखे वागावे हा त्यावरचा उपाय आहे. समझनेवालों को इशारा काफी है।