आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Attacks On Government After Attack On Govind Pansare

महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे, शिवसेनेचा सरकारला घरचा आहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर शिवसेनेने पुन्हा आपल्याच सरकारला पिंजऱ्यात उभे केले आहे. या निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची ? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील संबंध मंत्र्यांच्या अधिकारांवरून ताणले गेले आहेत. त्यात या प्रकरणानंतर गृहखाते भाजपकडे असल्याने शिवसेनेने सरकारवर हल्ला करत अप्रत्यक्षपणे भाजपवरच हल्ला चढवला आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची अशाच प्रकारच्या हल्ल्यात हत्या करण्यात आली होती. त्यावेळी विरोधात असलेल्या शिवसेना आणि भाजपने चांगलेच अकांडतांडव केले होते. या मुद्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला अगदी सळो की पळो करून सोडले होते. त्याचाच दाखला देत शिवसेनेने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी सरकारला जाब विचारणाऱ्यांना या अग्रलेखातून, आता या प्रकरणाची जबाबदारी कोणाची? असा सवाल विचारण्यात आला आहे. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचेही अग्रलेखात म्हटले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा गृहखाते असणाऱ्या भाजपला लक्ष्य करून अधोरेखित करण्यात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अग्रलेखातील मजकूर असा...
सामना वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या या अग्रलेखात असे म्हटले आहे की, कोल्हापूर उजळवून टाकत असतानाच हा अंधार झाला. हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडत आहे व सरकार बदलले तरी तेच घडत आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते व दाभोलकरांच्या खुनावरून त्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. आता दिवसाढवळ्या झालेल्या पानसरे यांच्यावरील निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत व गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असे बोंबलावे तर सरकार आपलेच आहे, पण आज दुसरे एखादे सरकार असते तर त्यांना याच शब्दांनी बेदम चोपले असते. गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीचे जुनेजाणते नेते आहेत. त्यांचे वय ८५ आहे. ते नि:शस्त्र होते. अशा नि:शस्त्र व्यक्तीवर व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण
आहे.