आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईला केंद्रशासित करण्याचा नवा डाव- शिवसेनेचा मोदींवर निशाणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली मुंबईच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे ‘स्पेशल पर्पज व्हेईकल बोर्ड’निर्माण केले जात आहे. ही एक कॉर्पोरेट खासगी कंपनी असणार आहे. याद्वारे महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ही केंद्रशासित किंवा केंद्राची वसाहत होणार आहे. मुंबईच्या ‘माथी’ नवे अंडरवर्ल्ड म्हणजे समांतर सरकारच मारण्याचा हा प्रकार असून या मायानगरीला मागच्या दाराने केंद्रशासित करण्याचा डाव रचला जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात यावर भाष्य करून शिवसेनेने ही भीती व्यक्त केली आहे. मात्र, त्यापूर्वी शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार त्यांनी पाहून घ्यावी. मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे व मुंबईतील 105 हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारून यावे, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.
काय म्हटले आहे 'सामना'च्या अग्रलेखात वाचा, एक-एक मुद्दे...
- ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाप्रमाणेच ‘विकास’ हा शब्दसुद्धा अलीकडे हास्यास्पद ठरला आहे. सध्या जो उठतोय तो विकासाचे नवे मॉडेल घेऊन जादूचे प्रयोग करताना दिसत आहे.
- ‘स्मार्ट’ सिटीच्या नावाखाली मुंबईसह देशभरातील अनेक शहरांत विकासाची झटपट क्रांती आणण्याचे ठरवले गेले आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांचा नवा वसाहतवाद, संस्थानशाही निर्माण होणार असेल तर शिवसेना निदान ‘मुंबई’सारख्या शहरांना धनदांडग्यांची कायमस्वरूपी रखेल होऊ देणार नाही.
- ‘स्मार्ट सिटी’नामक जो काही आराखडा समोर आणला जातोय तो भांडवलदार, व्यापारी व बिल्डरधार्जिणा आहे हे आम्ही मुंबईच्या बाबतीत तरी ठामपणे सांगू शकतो. या ‘स्मार्ट सिटी’त मुंबईतला सामान्य माणूस, भूमिपुत्र नसेल तर आग लावा तुमच्या त्या विकासाला?
- ‘स्मार्ट सिटी’च्या नावाखाली मुंबईच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे ‘स्पेशल पर्पज व्हेईकल बोर्ड’ निर्माण होईल व ही एकप्रकारे कॉर्पोरेट धर्तीची खासगी कंपनी असेल. अदानी, अंबानी, लोढा, गोयंका, मित्तल वगैरे उद्योगपती ज्या पद्धतीने आपल्या कंपन्यांत ‘डायरेक्टर’, ‘सीईओ’, ‘सीएमडी’ अशी इंग्रजी पदे देऊन कारभार करतात त्याच पद्धतीने मुंबईवर ‘सीईओ’ व ‘संचालक’ वगैरे नेमून कारभार चालवला जाईल व त्यावर केंद्राचे थेट नियंत्रण राहील. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ ही एकप्रकारे केंद्रशासित किंवा केंद्राची वसाहत होईल.
-‘स्मार्ट सिटी’चा विनोद म्हणावा की हा महाराष्ट्राच्या राजधानीचा अपमान? ज्या मुंबईचे वार्षिक बजेट सुमारे 34 हजार कोटी आहे त्या मुंबईला म्हणे केंद्र सरकार ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी 500 कोटी रुपयांचे चिंचोके देईल. म्हणजे एखाद्या ‘सम्राज्ञीस’ तिच्याच तिजोरीतून चोरलेली रक्कम भीक म्हणून देण्याचा हा प्रकार म्हणायला हवा.
- मुंबई केंद्राला वर्षाकाठी दीड लाख कोटींचा निधी ‘कर’रूपाने देत असते. यातला निदान २५ टक्के वाटा मुंबईला विकासासाठी म्हणून दिला तर हे शहरच काय संपूर्ण महाराष्ट्र देशात ‘स्मार्ट राज्य’ म्हणून आघाडीवर येईल, पण मुंबईच्याच पैशातून देशातील शंभर शहरे ‘स्मार्ट’ होणार आहेत.
- मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे व देशाचे आर्थिक केंद्र आहे. या आर्थिक केंद्राचा मलिदा आजही जे थैलीवाले दिल्लीचरणी अर्पण करतात तेच ‘स्मार्ट सिटी’चे ताबेदार होतील हे आता उघड झाले आहे.
- दिल्लीचे बादशाह राज्य करणार असतील तर ही एक प्रकारची आणीबाणी किंवा हुकूमशाहीच आहे. लोकनियुक्त पालिकांवर अशाप्रकारे ‘कंपनी’शाही नेमून राज्य करणे हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे.
- मुंबईस उघडे नागडे करून कोणत्या स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होणार आहे? मुंबईच्या लोकल प्रवासाचे हाल कुत्रा खात नाही. रोज 14 प्रवासी गर्दीमुळे पडून रेल्वे रूळावर मरत आहेत. तुमची बुलेट ट्रेन ‘मुंबई-अहमदाबाद’ धावायची तेव्हा धावेल. पण सध्या हे रोजचे मरण कमी करून लोकांना ‘स्मार्ट’ सुविधा देण्याची काय योजना आहे?
- मुंबई हा महाराष्ट्राचा पंचप्राण आहे. 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्रास मिळाली. मराठी माणसांनी प्राणपणाने मुंबईचे रक्षण केले. भले दिल्लीश्‍वरांनी मुंबईचा वापर वेश्येसारखा केला, पण मुंबईची इभ्रत व प्रतिष्ठा यासाठी शिवरायांचा भगवा सतत लढण्याची प्रेरणा देत राहिला.
- सरदार पटेलांनी 150 संस्थाने बरखास्त केली. स्मार्ट सिटीच्या नावाने 100 नवी शाही संस्थाने उभी राहणार आहेत. साबरमतीच्या गांधींनी पंचायतराजसारख्या भूमिकेतून लोकांच्या हाती सत्ता दिली. आज लोकांच्या हातून सत्ता काढून धनदांडग्यांना शहरांचे व राज्यांचे मालक बनवले जात आहे. इतका घाणेरडा प्रकार आणीबाणीतदेखील झाला नव्हता. मुंबईला मागच्या दाराने केंद्रशासित करण्याचा डाव कुणी रचत असेल तर शिवतीर्थावरील शिवरायांच्या हातातील तलवार त्यांनी पाहून घ्यावी. मराठवाड्यातील औरंगजेबाचे थडगेही पाहावे व मुंबईतील १०५ हुतात्म्यांच्या स्मारकावर फेरफटका मारून यावे. म्हणजे आम्हाला काय सांगायचे आहे ते कळेल.
बातम्या आणखी आहेत...