आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुषमा, वसुंधरांना क्लिन चिट मग मारियांचा गहजब कशाला- उद्धवचा भाजपला सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना क्लीन चिट देता मग मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया भेटल्याच्या प्रकरणाचा एवढा गहजब कशाला करता असा रोकडा सवाल शिवसेनेने भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. राजकारण्यांना सर्व गुन्हे माफ व त्याच कारणांसाठी अधिकारी विनाचौकशी फासावर जाणार असतील तर त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतील. ललित मोदी प्रकरणातील सत्य काय हे आज कोणीच सांगू शकत नाही. ललित मोदी हा एक नायटा आहे तो जितका खाजवाल तितका तो वाढतच जाईल. या नायट्याने मारियासारख्यांचे नाहक बळी जाऊ नयेत, असेही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, केंद्रातले मंत्री, राजस्थानच्या मुख्यमंत्री यांच्यावर मोदीप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मुंबईचे जोरकस पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही ललित मोदीप्रकरणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा बकवास प्रयत्न सुरू आहे. राकेश मारिया लंडन येथे एका कॉन्फरन्ससाठी गेले असताना ललित मोदी त्यांना स्वत:ची कैफियत सांगण्यासाठी भेटले. त्यानंतर मारिया यांनी त्यांना मुंबईत येऊन कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याची सूचना केली. मारियांनी मुंबईत येऊन मोदी भेटीबाबतचा तपशील गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कळवला. एक सरकारी अधिकारी यापेक्षा दुसरे काय करू शकतो? असा सवाल करीत मोदी भेटप्रकरणी मारियांना शिवसेनेने क्लीन चिट दिली आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया यांनी दहशतवाद्यांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या आणि ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी दुरवस्था झालेल्या मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात जे अजोड काम केले आहे ते कसे विसरता येईल? असे सांगत अग्रलेखात म्हटले आहे की, मुंबईच्या सुरक्षेचे आव्हान मारिया यांनी यशस्वीपणे पेलले. येथील गँगवॉर मोडून काढले. गुंडगिरीला लगाम लावला. दहशतवादी कारवायांना आळा बसण्यासाठी उपाययोजना केली. ‘26/11’च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील त्यांचे योगदान मोठेच आहे. असे सगळे असताना त्यांच्या ललित मोदी भेटीचा बागुलबुवा उभा करणे म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखेच आहे. या गोष्टी जोपर्यंत थांबत नाहीत तोपर्यंत राज्याच्या पोलीस दलात सुधारणा होणे अशक्य आहे. ललित मोदी प्रकरणात भाजप सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या मागे ठामपणे उभा आहे व विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी तुमच्या पदांना धोका नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ललित मोदी प्रकरणात केंद्र सरकारची व भाजपची भूमिका काय आहे हे काय आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायला हवे? मग तोच न्याय राकेश मारिया यांच्यासारख्या शूर अधिकार्‍यांना का नसावा? असे सांगत सेनेने मारियांना भक्कम पाठबळ दिले आहे. तसेच भाजपला मारियाप्रकरणी अस्ते कदम जाण्याचाही सल्ला अग्रलेखातून दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...