आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर उभारल्यास मोदींच्या लोकप्रियतेस चार चाँद- शिवसेना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रातील बहुमताने सत्तेत असलेल्या मोदी सरकारने राम मंदिराच्या उभारणीचे कार्य हाती घ्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ती हिंमत व धमक नक्कीच आहे. राममंदिर उभारणीचे कार्य हाती घेताच त्यांच्या अफाट लोकप्रियतेस आणखीनच चार चांद लागतील, अशी भूमिका शिवसेनेने 'सामना'त मांडली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिर माझ्या हयातीत होईल असे सांगून या वादाला तोंड फोडले आहे. यावर चर्चा झडत असताना भागवत यांनी घेतलेल्या भूमिकेचे शिवसेनेने स्वागत केले आहे. 'सामना'च्या आजच्या अग्रलेखात यावर भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, या देशात फक्त अल्पसंख्याक समाजाचेच चोचले पुरवले जातात असे नाही तर बहुसंख्य हिंदू समाजाचाही आवाज ऐकला जातो हे दाखवून देण्यासाठी राममंदिर उभे राहायला हवे. पंतप्रधान मोदी हे जगात लोकप्रिय आहेत. कारण स्वदेशातील बहुसंख्य हिंदू समाजाने त्यांना नेतृत्व बहाल केले आहे. संपूर्ण बहुमताचे 280 खासदारांचे सरकार त्यांच्या हाताशी आहे. म्हणूनच सरसंघचालकांच्या राममंदिराच्या मागणीचे महत्त्व जास्त आहे. राममंदिर आता नाही तर कधीच नाही, असे सांगत लवकरात लवकर आयोध्यात राम मंदिर उभारणीचे कार्य सुरु करावे असे शिवसेनेने म्हटले आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, अयोध्येत राममंदिर उभारणीचा विडा उचलून कामास लागणे यात लाज वाटावी असे काहीच नाही. 6 डिसेंबर 1990 रोजी अयोध्येत जे रणकंदन राममंदिरासाठी झाले त्यात शेकडो करसेवकांच्या रक्ताने व बलिदानाने शरयू नदी लाल झाली. पुढे दोन वर्षांनी बाबरीचे दोन घुमट कोसळून कलंक दूर झाला तो शिवसैनिकांमुळेच याची कबुली त्यावेळी खुद्द भारतीय जनता पक्षानेच दिली होती! मंदिर उभारणीसाठी बाबरी उद्ध्वस्त करणे हे हिमतीचे काम ज्या कोठारी बंधूंनी केले ते शिवसैनिक होते. त्यामुळे राममंदिरावर बोलण्याचा अधिकार शिवसेनेस आहे. इतके रक्त सांडूनही, बलिदाने देऊनही अयोध्येत राममंदिराची उभारणी करता येत नसेल तर त्या शेकडो हुतात्म्यांचे बलिदान काय कामाचे? त्याच बलिदानाच्या पायावर भारतीय जनता पक्षाने सत्तेची गरुडझेप घेतली आहे असेही 'सामना'तून मत व्यक्त केले आहे.
पुढे आणखी वाचा, काय म्हटले आहे शिवसेनेने मोहन भागवत यांच्याविषयी...
बातम्या आणखी आहेत...