आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिमगा संपून दिवाळीत पाडवा; शिवसेना-भाजपचे मनोमिलन!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत सतत कुरघोडीचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेना आणि भाजपने अखेर अपेक्षेप्रमाणे राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी युती करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले असतानाही एकमेकांच्या नावे शिमगा करणाऱ्या या मित्रपक्षांचे ऐन दिवाळीत मनोमिलन होत आहे. राज्यात २१२ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. तथापि, ही युती नगरपालिकांसाठीच असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईसह इतर महापालिकांसाठी मात्र हा निर्णय नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत उभय पक्षांची युती होणार असल्याची बातमी दै. ‘दिव्य मराठी’ने २० ऑक्टोबर रोजीच दिली होती. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करीत युतीत आलबेल असल्याचे दाखवून दिले. सूत्रांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत काही दिवसांपासून चर्चा होत होती. स्थानिक निवडणुकीत युती केली, तरच चांगले यश मिळेल, असा विश्वास उभय नेत्यांना होता. मात्र काही मुद्द्यांवर शिवसेना नेते आणि भाजप नेते अडून होते. तोडग्याचा प्रयत्न सुरू होता.

निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोघांनाही फटका बसेल. त्यामुळे गुरुवारी दिवसभर भाजप-शिवसेनेत घडामोडी सुरू होत्या. दानवे आणि उद्धव ठाकरे यांची बुधवारी रात्री फोनवर चर्चा झाली होती.

शिवसेना खासदार विनायक राऊत दानवे यांच्यात दानवे यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ चर्चा झाली. राऊत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी महापौर बंगल्यावर गेले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बोलणे होऊन युतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत तशी घोषणा केली.

दोन्ही पक्षांसाठी निवडणुकीत फायद्याचे
दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन युतीचा निर्णय घेतला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत युती असेल. दोहोंनाही याचा फायदा होईल, असे शिवसेनेचे नेते राऊत यांनी म्हटले. तुकड्या तुकड्यात युती होऊ नये असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे. त्यामुळे सर्वत्र युती करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले. ही युती नगरपालिकांपुरतीच आहे. इतर संस्थांसंबंधी कळवू, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...