आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Contesting Delhi Assembly Election, Want To Give Harresh Bjp In Delhi

शिवसेनेचे दिल्लीत उमेदवार; भाजपला धडा शिकविण्यासाठी उद्धव यांचे \'पाऊल पडते पुढे\'!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात शिवसेनेशिवाय निवडणूक लढवून भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापन केले आहे. अखेर गरज म्हणून भाजपने शिवसेनेला सोबत घेतले असले तरी भाजपचा 'शत-प्रतिशत'चा नारा कायम आहे. भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही स्वबळाचीच भाषा सुरू केली आहे. त्यामुळे भाजपच्या घौडदौडीला रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीही तयारी सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्ली विधानसभा लढवणे व राज्यात भाजपविरोधात वातावरण कसे तयार होईल यासाठी उद्धव यांनी तयारी सुरु केली आहे.
भाजप नेते शिवसेनेला फार जुमानत नसल्याने उद्धव यांनीही आपल्या पद्धतीने शह देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेना आपले उमेदवार लवकरच घोषित करेल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. याचबरोबर राज्यात भाजप सरकारसोबत शिवसेना असली तरी शेतक-यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे म्हटले आहे. दुष्काळामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत शिवसेना जरी सत्तेत असली तरी ती शेतकर्‍यांसोबतच राहील. शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे ही आमची आग्रही भूमिका आहे. शिवसेना शेतकर्‍यांची साथ-सोबत कधीही सोडणार नाही, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. मागील आठवड्यात आपल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून उद्धव ठाकरे यांनी मिळालेला दोन कोटींचा निधी शेतक-यांना देऊन भाजपवर कुरघोडी केल्याचे मानले जात आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय ही चिंतेची बाब आहे असे सांगत कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. असे असले तरी उद्धव हे फडणवीस यांची पाठराखण करीत आहेत व ते अडचणीत येणार नाहीत याची दक्षता घेत असल्याचे दिसून येत आहे.
भाजपला अडचणीत आणण्यासाठी दिल्लीत उमेदवार- दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिवकुमार तिवारी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्यामागे भाजपला शह देणे हीच शिवसेनेची रणनिती आहे. दिल्लीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद नगण्य आहे. दिल्ली विधानसभेत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसतानाही उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा का निर्णय घेतला असेल हे स्पष्ट होत आहे. मोदी यांना न मानणा-या काही कट्टर हिंदुत्त्ववादी संघटना दिल्लीत शिवसेनेला मतदान करण्याची शक्यता आहे. उद्धव यांच्या या खेळीचा भाजप नेत्यांना अंदाज आला आहे. मात्र, आपले नुकसान होणार असल्याचे दिसत असतानाही शिवसेनेला फारसे महत्त्व देण्यास भाजप तयार नाही.
मित्रपक्षांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी उद्धव सरसावले- भाजप-शिवसेना महायुतीतून बाहेर पडून घटकपक्षांच्या मदतीने भाजपने नवी महायुती बनवली. त्याचा फायदा भाजपने विधानसभा निवडणुकीत उचलला. आठवले यांच्यामुळे दलित व्होट बॅँक, शेट्टींमुळे शेतकरी व कष्टकरी वर्ग तर महादेव जानकर यांच्यामुळे राज्यात 10 ते 12 टक्के समाज असलेला धनगर समाज भाजपने आपल्याकडे वळविला. भाजपने अशी राजकीय व सामाजिक समीकरणे जुळवून आणत सर्वाधिक 122 जागा जिंकल्या. मात्र, आता भाजप मित्रपक्षांना मंत्रिमंडळात घेण्यावरून घुमजाव करीत आहे. त्यामुळे चारही मित्रपक्ष भाजपवर कमालीचे नाराज आहेत. त्याचाच फायदा उद्धव ठाकरे उठविण्याच्या मनस्थितीत आहेत. दुसरीकडे, आपल्या पक्षातील नेत्यांशी सुसंवाद राहावा यासाठी सर्व खासदारांना घेऊन रविवारी (18 जानेवारी) तिरुपतीला जात आहेत. शिवसेनेच्या शिलेदारांना घेऊन मी एकवीरा देवीला जातो, देवदर्शन करतो त्याप्रमाणेच तिरूपतीला जात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
राजू शेट्टींच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा- सध्या राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ऊसाचा हंगाम सुरु होऊन तीन महिने झाले तरी शेतक-यांना ऊसाचे पैसे मिळाले नाहीत. याचप्रश्नांवरून सरकारच्याविरोधात खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यात आंदोलन केले. या ऊसदरांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने तत्काळ पाठिंबा दिला व भाजपवर नाराज असलेल्या मित्रपक्षांना हवा देण्याची खेळी केली आहे. रामदास आठवले आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध मूळचेच चांगले आहेत. धनगर समाजाला जवळ करण्यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभेत या समाजाला अनुसूचित जमातीत लवकरात लवकर टाकावे व आरक्षण सवलतीच्या सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे. भाजप सरकारसोबत सत्तेत असल्याने शिवसेनेने 'थंडा करके खावो' अशी भूमिका घेतली असली तरी उद्धव ठाकरे यांनी भाजपला धडा शिकविण्यासाठी जे जे काही करता येईल त्याची तयारी करून ठेवल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.