आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सामना' सुरुच! मुंबईतच उपलोकायुक्तांचे लचांड का, ‘वर्षा’वरही नेमा, शिवसेनेचा भाजपवर हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपने मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक गोष्टी सुरळीत होणार असे वाटत होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी चहापानाच्या कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची हसत खेळत सुरू असलेली चर्चा पाहून सर्व काही आलेबल झाले असे वाटले. पण ते केवळ काही तासांपुरतेच. कारण सोमवारी प्रकाशित झालेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेने मुख्यमंत्री आणि भाजपच्या मुंबईत उपलोकायुक्त नेमण्याच्या मुद्द्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. उपलोकायुक्त फक्त मुंबईत का सर्वच महापालिकांत नेमा आणि 'वर्षा' बंगल्यावरही उपलोकायुक्त नेमा असे सामनातून म्हणण्यात आले आहे. 

सामनातून असा केला हल्ला.. 
> सत्ता आणि पैशाने ‘घडा’ भरूनही शिवसेनेवर विजय मिळवणे अवघडच झाले होते. अर्थात अशा अवघड व कठीण परिस्थितीतच शिवसेना तेजाने उजळून निघते. 
> मुंबईचे महापौरपद काही झाले तरी शिवसेनेला मिळू द्यायचे नाही व यानिमित्ताने मराठी अस्मितेला महाराष्ट्राच्या राजधानीतच ‘दफन’ करायचे असे ‘निजामी’ विडे उचलण्यात आले. 
> पारदर्शकतेचा नगारा हे एक राजकीय ढोंग आहे. मुंबईची ओळख ‘मराठी’ जनता हीच आहे; पण मुंबईत इतर प्रांतीयही मोठय़ा संख्येने राहत आहेत. 
> अहिंसेवर प्रवचने झोडणारे जैन मुनी व त्यांचा समाज काही लाखाने मुंबईत राहतो. या जैन मुनींनी भारतीय जनता पक्षाचे ‘भाडोत्री’ एजंट असल्यासारखा प्रचार मुंबईत केला. 
> मुंबईतील कत्तलखाने व मांसाहार बंद करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाला मतदान करा, असे फतवे काढून एकगठ्ठा जातीय मतदान भाजपकडे वळवले. यास तुम्ही पारदर्शकतेला झालेले मतदान म्हणत असाल तर ते ढोंग आहे. 
> मुख्यमंत्री म्हणतात, आमचे निवडून आलेले ८२ नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील. हीसुद्धा
एक थापच आहे. 
> मुख्यमंत्री व त्यांचे सरकार ‘कोणत्याही’ तडजोडी करतच नव्हते तर मग तुरुंगातील पिताश्रींशी संवाद साधून नगरसेविका कन्येस भाजपच्या गोटात खेचण्याचे जे ‘पारदर्शक’ प्रयोग झाले त्यास मुंबई महापालिकेचा कारभार ‘माफियामुक्त’ करण्याचे नवे डावपेच समजायचे काय? 
> यंदाच्या निवडणुकीत मुंबईला थैलीशहांची बटीक बनवून दिल्लीची कायम दासी बनवायची की श्रमिक व कष्टकऱयांची ‘आई’ म्हणून तिच्या खऱया पहारेकऱयांच्या हाती म्हणजे शिवसेनेकडे सूत्रे द्यायची याचा निकाल लागला आहे. 
> भाजपला महापालिकेच्या तिजोरीचे व ठेकेदारीच्या खजिन्याचे पहारेकरी व्हायचे असेल; पण मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे व हे सर्वमान्य, सर्व पक्षीय सत्य आहे. या सचोटीवर तुम्ही काय म्हणून पहारेकरी बसवणार?
> खास उपलोकायुक्तांची नेमणूक केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. हा पराभवानंतरचा रडीचा डाव व सत्तेचा दुरुपयोग आहे.
>  हे जे काही उपलोकायुक्तांचे लचांड आहे त्यास आम्ही डरत नाही; पण तुमच्याच सरकारी ‘आयुक्ता’वरचा हा अविश्वास आहे. 
>  सगळय़ात जास्त घोटाळे हे नागपूर महानगरपालिकेत आहेत. मग तेथे तुमचे ते उपलोकायुक्तांचे लचांड का नाही? पुणे-पिंपरी, चिंचवड वगैरे महानगरपालिकांत पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्तांना का नेमले नाही, यामागचे गौडबंगाल लोकांना समजते. 
> खरं तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीतही लोकायुक्तांना कायमची खुर्ची ठेवण्याची ‘पारदर्शकता’ आणली तरच सत्य व ढोंग यातला फरक लोकांना समजेल.
> मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकांपासून पारदर्शकतेची घडी बसवायला सुरुवात करावी व एक आदर्श पायंडा घालून द्यावा. मुंबईचे काय करायचे ते आम्ही पाहू. अशा अनेक थैलीबाज लचांडांना आम्ही पुरून उरलो आहोत. त्यामुळे कोणत्याही टांगत्या तलवारीची भीती आम्हाला नाही.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...