आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critics Daily At Saamana\'s Editorial On Narendra Modi & Bjp

मोदी अन् भाजप बनलयं शिवसेनेचं \'गि-हाईक\'; \'सामना\'तून दररोजच हल्लाबोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरेंसह संपूर्ण सेनेच्या नेत्यांनी भाजपवर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून तर आता दररोजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सेना बाण सोडत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून मोदी अन् भाजप शिवसेनेचे टीकेचे गि-हाईकचं बनले आहे. आज 'सामना'तून मोदींवर टीका करताना म्हटले आहे की, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी 56 इंच छातीची गरज आहे काय? मोदींजी, महाराष्ट्राचे राजकारण नंतरही करता येईल पण, आता पाकड्यांच्या कुरापती सहन करू नका. आपण फक्त आपलेच मुडदे मोजत बसायचे काय? त्यांनी आमचे पाच मारले आहेत. नुसते प्रचाराला येथे येऊ नका, त्यांचे 50 मारून मुंडक्यांची रास शिवरायांच्या महाराष्ट्रात घेऊन या. महाराष्ट्र मर्दांचा व शूरांचा नेहमीच सन्मान करतो, असा हल्लाबोल 'सामना'तून करण्यात आला आहे.
भारत-पाक सीमेवरील परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनू लागली आहे. पाकिस्तानी सैन्य रोजच युद्धबंदीचा करार पायदळी तुडवून भारतीय हद्दीत गोळीबार करून, तोफगोळे डागून निरपराध नागरिकांचे बळी घेत आहे. पाकला धाक बसेल असे कोणतेच कठोर पाऊल मोदी सरकारकडून उचलले जात नसल्यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधी मोडण्याचा प्रकार राजरोस सुरुच आहे. सोमवारी बकरी ईदच्या दिवशी पाकिस्तानने युद्धबंदीच्या चिंधड्या उडवत जम्मूजवळच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला. या भयंकर हल्ल्यात पाच भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी रोज 4-4 सभा घेत आहेत. शिवसेना-भाजपमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपाची फैरी झडत असतानाच शिवसेनेने नरेंद्र मोदींना व भाजपला धोबीपछाड देण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे. आजच्या अग्रलेखातूनही मोदींवर कडक शब्दात प्रहार केले आहेत.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पाकचे हे असे हल्ले आणखी किती काळ चालणार आहेत? गेल्या सहा दिवसांत तब्बल 11 वेळा युद्धबंदी मोडून पाकिस्तानने भारतीय सीमेवर गोळीबार केला आहे. ताज्या हल्ल्यात भारतीय नागरिकांच्या रक्ताने सरहद्द भिजली असतानाही बकरी ईदची मिठाई पाकिस्तानला देण्याचा सोस कशासाठी? पुन्हा पाकड्यांनीच आपली मिठाई नाकारून सीमेवरचे गेट बंद करून घेतले, हा अपमान वेगळाच. पूर्वीच्या काँग्रेसी सरकारांनी जे केले तेच आताही सुरू राहणार असेल तर कसे व्हायचे? विद्यमान केंद्र सरकारने पाकसोबतची सचिव पातळीवरील चर्चा बंद करून झटका दिला असला तरी तेवढे पुरेसे नाही. गोळीला गोळीने उत्तर देऊ असा इशारा केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पाकिस्तानला दिला होता. तो अमलात कधी येणार? डोळ्याला डोळा भिडविण्याची भाषा कृतीत कधी उतरणार? हे होत नाही तोपर्यंत पाकच्या सीमेवरील उचापती सुरूच राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत व महाराष्ट्रातील अनेक गावांत त्यांच्या प्रचारसभा सुरू आहेत. मोदी यांची गरज दिल्लीत असताना राज्यातील भाजप नेत्यांनी त्यांना इकडे असे अडकवून ठेवणे हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा आहे, पण येथे सत्य बोलायचे कोणी? लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील मोदी यांची पाकिस्तान व कश्मीरबाबतची भाषणे प्रेरणादायी होती. मोदी व समस्त भाजप उत्सव मंडळाने या भाषणांवर कटाक्ष टाकला तरी देशाला नक्की काय हवे याची कल्पना येईल. देशाचे रक्षण करण्यासाठी व पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी 56 इंच छातीची गरज आहे काय? हा वादाचा मुद्दा, पण लढण्याची जबरदस्त इच्छा असेल तर कुणाची छाती मोजण्याचीही गरज नाही. महाराष्ट्राचे राजकारण नंतरही करता येईल पण मोदीजी, आता पाकड्यांच्या कुरापती सहन करू नका. आपण फक्त आपलेच मुडदे मोजत बसायचे काय? त्यांनी आमचे पाच मारले आहेत. त्यांचे 50 मारून मुंडक्यांची रास शिवरायांच्या महाराष्ट्रात घेऊन या. महाराष्ट्र मर्दांचा व शूरांचा नेहमीच सन्मान करतो, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या धोरणावर शिवसेनेने केली आहे.