मुंबई- महाराष्ट्रापासून विदर्भास तोडणे म्हणजे आईपासून मुलास तोडण्यासारखे आहे. विदर्भातील मुख्यमंत्र्याने महाराष्ट्र तोडण्याची भाषा करावी म्हणजे महाराष्ट्राच्या रखवालदारानेच ‘घोटाळा’ करण्यासारखे आहे. विदर्भाचे मागासलेपण आहेच. ते दुरुस्त करण्याचे कर्तव्य पार पाडावे. विदर्भाच्या विकासासाठी पंतप्रधान
नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांनीही हातभार लावावा आणि विदर्भ सक्षम, बळकट, स्वावलंबी बनवला तर विदर्भाच्या विकासाची गाडी जोरात धावेल. मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांनी
आपली ‘विदर्भ एक्स्प्रेस’ विकासाचा मार्ग बदलून स्वतंत्र विदर्भाच्या मार्गावर घसरू नये, अशी टीका शिवसेनेने 'सामना'तून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतंत्र विदर्भाच्या भूमिकेवर केली आहे.
शिवसेनेने आज सामनातून 'फडणवीसांची विदर्भ एक्स्प्रेस' नावाचा अग्रलेख लिहून त्यांनी स्वतंत्र विदर्भाचे केलेल्या समर्थनाबाबत सल्ला वजा टीका केली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भव्य स्वागत झाले. मुख्यमंत्र्यांनी उत्साहाच्या भरात ‘स्वतंत्र विदर्भ योग्य वेळी होईल.’ असे वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांना हा विषय सहज टाळता आला असता. विदर्भाच्या विकासावर त्यांनी दमदारपणे बोलायला हवे होते. चंद्रपूर-गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासंदर्भात पोलिसांना ताकद देण्याची भूमिका त्यांना मांडता आली असती, पण अखंड महाराष्ट्राच्या केशरी दुधात त्यांनी मिठाचा खडा टाकून काय मिळवले? असा सवाल सेनेने उपस्थित केला आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने भाजपवर कशा शब्दांत हल्लाबोल केला आहे...