आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critics On Sharad Pawar\'s Statement At Saamana Editorial

शरद पवारांचे इमान कोणते? त्यांचे राजकारण आता औटघटकेचे- शिवसेनेची सडकून टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शरद पवार जे बोलतात ते कधीच करीत नाहीत. किंबहुना जे बोलतात त्याच्या उलटच नेहमी वागतात. भ्रम व हवा निर्माण करून गोंधळ उडवायचा व त्या गोंधळात एखाद्दुसरी पाकीटमारी करायची असे त्यांचे नेहमीचे बेभरवशाचे राजकारण राहिले आहे. महाराष्ट्राचे सरकार अस्थिर आहे याचा फायदा ते घेत आहेत, पण शिवसेना महाराष्ट्रात पाय रोवून उभी आहे. पवारांना जे करायचे ते करू द्या. त्यांचे राजकारण औटघटकेचे आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका शिवसेना इमानाने बजावत आहे. कारण आमचे इमान सत्तेशी नसून महाराष्ट्राशी आहे. मात्र पवारांचे इमान कोणते याबाबत ते स्वत: ठामपणे सांगू शकतील काय? अशा शब्दात शिवसेनेने शरद पवारांवर टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'त आज 'बेभरवशाचे राजकारण व्वा! व्वा! पवार' या मथळ्याखाली अग्रलेख लिहला आहे. यात शरद पवारांनी अलिबागमध्ये केलेल्या मध्यावधीला तयार राहा या वक्तव्याबाबत सडकून टीका केली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वय फार नाही. अद्याप त्यांनी सोळावे वरीसही गाठलेले नाही, पण या वयातही त्यांना सोयीनुसार स्मृतिभ्रंशाचे झटके येत असतात. जनतेने त्यांना इतक्या वेळा डोक्यावर आपटूनही असे झटके का यावेत हे राजकीय वैद्यकशास्त्रासाठीदेखील कोडेच आहे. आताही अचानक शरद पवार यांना स्मृतिभ्रंशाचा जबरदस्त झटका आल्यासारखे दिसत आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी एक गमतीचे विधान केले. सहा महिन्यांत स्थिर सरकार आले नाही तर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागेल.
पवारांचे म्हणणे असे की, स्थिर सरकारचा मक्ता आम्ही घेतलेला नाही. सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती दीर्घकाळ स्थैर्याची नाही. ही सर्व विधाने पवारांनी सोमवारी अलिबाग मुक्कामी केली आहेत. पण राज्यात निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना राष्ट्रवादीने तत्काळ भाजपास पाठिंबा जाहीर करून टाकला होता व त्याचा खुलासा असा केला होता की, ‘काय करणार? राज्यामध्ये अस्थिरता निर्माण होईल अशी भीती वाटल्यानेच आम्ही भाजपास पाठिंबा देत आहोत.’ व्वा! व्वा! पवारांच्या या भूमिकेमुळे व त्यांच्या या हेतूने महाराष्ट्र बुचकळ्यात पडला. अर्थात महाराष्ट्राने बुचकळ्यात पडावे असे निर्णय पवार नेहमीच घेत असतात. मंगळवारी ‘मध्यावधी निवडणुकीची’ हमी देणारे शरद पवार तेव्हा, म्हणजे भाजपास पाठिंबा देताना म्हणालेच होते, की ‘वैचारिक तडजोड कदापि करणार नाही. मात्र जनतेला पुन्हा निवडणुकांना सामोरे जाण्याची नामुष्की येऊ नये म्हणून स्थिर सरकारच हवे. त्यासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. आम्ही सत्ताधारी नव्हे, तर विरोधी पक्षात बसून विधायक राजकारण करू.’ शरद पवारांनी स्वत:च आठवडाभरापूर्वी केलेल्या ‘गोळीबारा’स आता कंठस्नान घातले आहे व राज्यातील विद्यमान सरकार अस्थिर असून ते कधीही पडू शकेल आणि मध्यावधी निवडणुका होतील अशी धमकीच दिली आहे, अशी टीका करीत पवारांच्या राजकारणावर आसूड ओढले आहेत.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने कशा शब्दात टीका केली आहे शरद पवारांवर...