आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Critics Once Again On Bjp & Cm Fadanvis

\'फडणवीस, कोणत्या मुहूर्तावर शपथ घेतली? वर्षातच वावटळी का उठताहेत?\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या मुहूर्तावर स्वत:सह मंत्रिमंडळास शपथ दिली ते पुन्हा एकदा तपासून पाहावे लागेल. फडणवीस सरकारातील इतर मंत्री वादाच्या व व्यवहाराच्या वादळात सापडले आहेत. आता या मंत्र्यांना वाचवता वाचवता खुद्द मुख्यमंत्रीही विमान विलंब प्रकरणावर ‘असे काही घडलेच नाही!’ असे सांगत आहेत. वर्षभरातच अशा सर्व वावटळी का उठत आहेत? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन दिवसापासून अमेरिका दौ-यावर आहेत. त्यांच्यासमवेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह 8-10 वरिष्ठ अधिकारी आहेत. मात्र, त्यांच्या दौ-याच्या प्रवासासाठी निघालेले एक आएएस अधिकारी प्रविण परदेशी हे व्हिसा व पासपोर्टची काही कागदपत्रे घरी विसरले. त्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला दीड तास विलंब झाल्याने याची देशभर चर्चा सुरु झाली आहे. पीएमओ कार्यालयाने या घटनेची दखल घेऊन अहवाल मागवला आहे. त्यामुळे खुद्द फडणवीस यांचाही संयम ढळला आहे. मला नाहक यात गोवू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करेन अशी तंबी त्यांनी माध्यमांना दिली आहे. या सर्व प्रकारामुळे प्रथमच मुख्यमंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. याआधी फडणवीस सरकारमधील पाणीपुवठा मंत्री बबन लोणीकर हे पदवी व दोन पत्नी वादाने चर्चेत आले. त्यानंतर विनोद तावडेंचे बोगस विद्यापीठ प्रकरण बाहेर आले. त्यानंतर तावडेंचे 191 कोटींचे कंत्राट तर पंकजा मुंडेंच्या खात्यातील 206 कोटींचे कंत्राट वादात अडकले. त्यामुळे देशात फडणवीस सरकारची बदनामी होऊ लागली. मुख्यमंत्री स्वच्छ प्रतिमेचे, प्रामाणिक असले तरी त्यांचे सरकार अलिकडे रोजच नव्या नव्या वादात अडकत चालल्याचे दिसत आहे. आता फडणवीस वादात सापडले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपमधील घडामोडीवर भाष्य केले नसते तरच नवल!
शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखात यावर टीका करताना म्हटले आहे की, फडणवीस सरकारच्या बाबतीत जे घडत आहे त्यावर अनेकांच्या भिवया उंचावल्या गेल्या आहेत. चर्चगेटच्या त्या भव्य स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात फक्त भाजपच्याच मंत्र्यांनी मोठ्या ऐटीत व झोकात शपथ घेतली होती. शिवसेनेशिवाय महाराष्ट्रातील नवे राज्य लीलया चालवू शकू अशी त्यांची श्रद्धा होती, पण बहुधा महाराष्ट्रातील कुलदैवतांना, शिवरायांना हे मान्य नसावे व आज मुख्यमंत्र्यांसह भाजपचे तालेवार मंत्री वादळात सापडले आहेत. मुख्यमंत्री त्यांच्या सात-आठ लोकांच्या उत्सव मंडळाबरोबर अमेरिकेस पोहोचले आहेत व अमेरिकेतून ते महाराष्ट्रासाठी मोठा व्यापार-उद्योग आणणार आहेत. हा व्यापार व उद्योग महाराष्ट्रात यावा व त्याचे नेतृत्व फडणवीस यांनी करावे याबद्दल आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत, पण अमेरिकेसाठी विमानात चढताना त्यांच्या मंडळातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने घोळ घातला. ‘व्हिसा’ घरीच विसरून हे महाशय मुख्यमंत्र्यांबरोबर विमानात चढले हा आता वादाचा विषय ठरत आहे. मुळात प्रवीण परदेशी यांच्यासारख्या अधिकार्‍याच्या बाबतीत ही गफलत व्हावी याचे आश्‍चर्य वाटते. त्यांच्या नावातच ‘परदेशी’ आहे, पण परदेशी जाण्याचे साधे नियम त्यांना माहीत नसावेत? मंत्रालयातील एखादा कारकून व पट्टेवाल्याने अशी चूक केली असती तर समजण्यासारखे आहे, असे सांगत परदेशींवर टीका केली आहे.
पुढे आणखी वाचा, शिवसेनेने काय काय मुद्दे उपस्थित केले आहेत....