मुंबई- देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी हे टोलेजंग नेतृत्त्व आहे. पण ते सध्या दिल्लीचा कारभार सोडून महाराष्ट्रातील गावागावांत जाहीर सभा घेत फिरत आहेत व रोज नवी आश्वासने देत आहेत. त्यामुळे असे गावोगाव फिरणे त्यांच्या इभ्रतीस शोभणारे नाही, पण भारतीय जनता पक्षाकडे मोदी यांच्याशिवाय दुसरे कोणतेच नाणे नसल्याने त्या नाण्याचा खणखणाट करीत भाजपवाले राज्यभर फिरवत आहेत, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा 'आब' राखावा अशी खरमरीत टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
'सामना'चा अग्रलेखातून मागील काही दिवसापासून भाजप व त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे.
अमित शहा, नरेंद्र मोदींपासून सर्व नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले गेले आहे. आजही मोदींच्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या 20-25 सभांवर हल्लाबोल केला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असल्याने त्या धुरळ्यात अनेकजण गुदमरले आहेत. दिल्लीचा कारभार सोडून पंतप्रधान महाराष्ट्रातील गावागावांत जाहीर सभा घेत फिरत आहेत. आम्हाला मोदी यांच्यावर व्यक्तिगत टीकाटिप्पणी करण्यात अजिबात रस नाही, पण पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी महाराष्ट्रासाठी नेमके काय केले? हा प्रश्न राज्यातील 11 कोटी जनतेला पडला आहेच. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले, पण ते गुजरातच्या बाहेर पडले नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान होऊनही मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत आहेत. महाराष्ट्रातील गोष्टी गुजरातला घेऊन जाण्यासाठी तुम्हाला सत्ता हवी आहे काय?’ असा त्रागा राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे. हे सर्व विचार आम्ही अनेकदा मांडले आहेत, असे अग्रलेखात म्हटले आहे.