आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना जमवणार मराठा समाजाची गर्दी, दसऱ्या मेळाव्यात दाेन्ही काँग्रेस असेल टार्गेट!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचा एेतिहासिक दसरा मेळावा मंगळवारी शिवाजी पार्कवर दरवर्षीप्रमाणेच भव्य प्रमाणात अायाेजित करण्यात अाला अाहे. मराठा माेर्चाच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’त छापून अालेल्या वादग्रस्त व्यंगचित्रामुळे टीकेचे धनी बनलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला राज्यातून जास्तीत जास्त मराठा समाजाचे लाेक जमविण्यासाठी प्रयत्न सुरू केले अाहेत. पक्षातील प्रमुख नेत्यांवर ही जबाबदारी साेपविण्यात अाली अाहे, अशी माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. दरम्यान, या मेळाव्यात उद्धव ठाकरे मराठा आरक्षणावर पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या व्यंगचित्रामुळे मराठा समाज आणि शिवसेनेतील मराठा नेते, अामदार शिवसेनेवर नाराज झाले होते. पक्षाचे प्रवक्ते व ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर नाराज असलेल्या नेत्यांनी एकत्र येऊन त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शिवसेनेचे राजकारण जवळून पाहिलेल्या संजय राऊत यांनी या मराठा नेत्यांची काही डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे राजीनाम्याच्या तयारीत असलेल्या मराठा नेत्यांना आपली शस्त्रे म्यान करावी लागली. मात्र यासाठी उद्धव ठाकरे यांना मराठा समाजाची माफी मागावी लागली. उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्यानंतर संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली. खरे तर कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत यांनी सर्वप्रथम माफी मागावयास हवी होती, अशी पक्षातील मराठा अामदारांची अपेक्षा हाेती. परंतु या वादामुळे शिवसेनेला मराठा समाजातून माेठा फटका बसेल ही शक्यता लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनीच जाहीर माफी मागितली हाेती.
शिवाजी पार्कवर मंगळवारी हाेणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मराठा समाज मोठ्या प्रमाणावर कसा येईल याची आखणी पक्षाकडून केली जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांवर मराठा समाजाच्या महिला आणि तरुणांना मोठ्या प्रमाणावर दसरा मेळाव्याला घेऊन यावे, असे सांगण्यात आले आहे. मराठा समाज शिवसेनेवर नाराज नसून तो शिवसेनेच्या सोबतच आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने उद्धव ठाकरे करणार अाहेत.
दाेन्ही काँग्रेस टार्गेट
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आरक्षणाच्या मुद्द्याबरोबरच मराठा आरक्षणावर सुरू असलेल्या राजकारणावर टीका करणार आहेत. त्यांच्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजावर केलेल्या अन्यायाचा उल्लेख जोरदारपणे केला जाणार आहे. तसेच मुंबई मनपा निवडणुकांबाबतही उद्धव ठाकरे शिवसैनिकांना आदेश देणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...