आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा गोंधळात गोंधळ ...तर विरोधी बाकांवर बसू - उद्धव ठाकरेंची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीसोबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत विरोधी बाकांवर बसण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. भाजप जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर आमचा मार्ग वेगळा असेल असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तो मार्ग कोणता, असे पत्रकारांनी विचारले असता, विरोधी बाकावर बसण्याची तयारी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भगवा दहशतवाद हा शब्द रुजवणारे शरद पवार आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार पाडणारे शरद पवार होते. त्यांच्या पाठिंब्यावर जर भाजप सत्तेत राहाणार असेल तर आम्ही विरोधी बाकावर बसण्यास तयार आहोत. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, असेही ते म्हणाले.
भाजप सोबत जाण्याची तयारी आहे का? या प्रश्नावर विधानसभा अध्यक्ष म्हणून कोणाचे नाव येते, यानंतर ते ठरविले जाईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

विधानसभा गटनेता निवडीसाठी ही बैठक असल्याचे सांगितले जात होते. मात्र, शिवसेना भवनाबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले होते. राज्यसभा खासदार अनिल देसाई मोदी सरकारमध्ये सहभागी न होता, दिल्लीहून रविवारी दुपारी परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. त्यामुळे शिवसेनेकडून होणार्‍या या शक्ती प्रदर्शनाचे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. शिवसेना भवनाबाहेरही शिवसैनिकांकडून 'भाजप हाय हाय'च्या घोषणा दिल्या जात होत्या.

शिवसेनेच्या भूमिकेवर भाजपची नाराजी
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला निमंत्रित केले असताना त्यांनी ऐनवेळी निमंत्रण नाकारले, हे दुर्दैवी आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यातील सत्तेच्या भागीदारीची चर्चा पद, संख्या आणि अटींवर नको असेही त्यांनी सांगितले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का, प्रश्नाचे उत्तर देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी टाळले. त्यामुळे भाजप विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी काय करणार हे अजूनही स्पष्ट नाही. दुसरीकडे महसुल मंत्री खडसे यांनी गरज पडल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचे संकेत दिले आहेत.