आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Demands Another Cabinet Minister Post In Fadanvis Govt

शिवसेना-भाजपमध्ये मंत्रिपदावरून पुन्हा जुंपणार, सेनेला हवंय आणखी एक कॅबिनेट खाते!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या आठवड्यात होण्याची शक्यता असून, फडणवीस यांच्या सरकारमध्ये आणखी 12 मंत्री शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मंत्र्यांमध्ये भाजपचे 6, शिवसेनेचे 2 आणि मित्रपक्षांच्या 4 जणांचा समावेश आहे. आगामी विस्तारात सेनेला 2 राज्यमंत्रीपद दिली जाणार आहेत. भाजपने आपल्या मंत्र्यांचा कोटा वाढविल्याने शिवसेना संतप्त झाली असून, येत्या विस्तारात शिवसेनेला आणखी एक कॅबिनेटमंत्रीपद द्यावे अशी मागणी खासदार गजानन किर्तीकर यांनी केली आहे.
भाजपने शिवसेनेशिवाय सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेला सत्तेत सामील करून घेतले. त्यावेळी फडणवीस यांच्या सरकार छोटे असेल व 36 पेक्षा जास्त मंत्री मंत्रिमंडळात नसतील असे भाजपच्या वतीने सेनेला सांगितले होते. त्यानुसार एकतृतीअंश सत्तेचा वाटा सेनेला दिला गेला. मात्र, आता भाजपने सरकारमध्ये 42 मंत्री असतील असा घाट घातला आहे. त्या फॉर्म्यूल्यानुसार शिवसेनेने भाजपकडे दोन राज्यमंत्रीपदासह आणखी एक कॅबिनेटमंत्री पद द्यावे अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गो-हे यांच्यासाठी या कॅबिनेट खात्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे. गो-हे यांना पंकजा मुंडे यांच्याकडे असलेले अतिरिक्त खाते महिला व बालकल्याण देण्यात यावे यासाठी शिवसेना भाजपकडे मागणी करणार असल्याचे कळते आहे. तर, उर्वरित दोन राज्यमंत्रीपदी मराठवाड्यातील एका नेत्याला व कोल्हापूरातील एका नेत्याला बसविल्यास प्रादेशिक समतोल साधला जाईल असे सेनेला वाटत आहे. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळात आपल्या कोट्यातील मंत्र्यांची संख्या 13 होईल असे गणित सेनेकडून मांडले जाईल. सेनेला आता देण्यात आलेल्या 5 कॅबिनेटखाती दुय्यम देण्यात आल्याने सेनेची भाजपवर नाराजी आहेच. मात्र, त्याबाबत अधिक जाहीर वाच्यता न करण्याचे धोरण उद्धव ठाकरेंनी अवलंबले आहे.
दरम्यान, भाजपमध्येच मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु असून आपली वर्णी लागावी यासाठी नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्नशील आहेत. फडणवीस यांनी मागील विस्तारात गडकरींच्या आग्रहामुळे विदर्भातील मंत्र्यांना वजनदार खाते देताना 5 जणांचा समावेश केला होता. त्यामुळे आता फडणवीस आपल्या मर्जीने मंत्री घेतील असे बोलले जात आहे. गडकरी गटाच्या नेत्यांना आपली वर्णी लागेल की नाही याची खात्री नाही त्यामुळे त्यांनी आतापासून त्यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र, आता रावसाहेब दानवेंची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या माध्यमातून गडकरी आपले समर्थक घुसवतील असे बोलले जात आहे. त्यातच आता शिवसेनेने आणखी एक कॅबिनेटमंत्रीपद मागितल्याने फडणवीस यांची कोंडी होणार आहे. भाजप शिवसेनेला कसे शांत करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.