मुंबई- शिवचरित्रावरील संशोधन, व्याख्याने, लेखन करणार्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काम प्रचंड मोठे असून त्यांच्या या तपश्चर्येचा योग्य सन्मान म्हणून त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करावा अशी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. पुरंदरे यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावरून काही संघटनांनी आक्षेप घेतला असतानाच शिवसेनेने अशी मागणी करून नविन वादाला खतपाणी घातल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक पत्र लिहून बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मश्री देण्याची विनंती केली आहे. त्यात शेवाळे यांनी म्हटले आहे की, ‘जाणता राजा’ या महानाट्याच्या माध्यमातून पुरंदरे यांनी शिवचरित्र जागतिक पातळीवर नेले. या नाट्याचे हिंदी-इंग्रजीसह 5 भाषांमध्ये सादरीकरण करण्यात आले. त्याचे हजारो प्रयोग झाले. पोर्तुगीजांकडून दादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामातही त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लेटर्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात भरीव काम केले. अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडसह काही दलित संघटनांनी याला जोरदार आक्षेप घेतला आहे. बाबासाहेबांच्या विचारधारेला अशा संघटनांचा पहिल्यापासून विरोध केला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाबासाहेबांच्या विचारधारेचे पारंपरिक विरोधक असलेले या निर्णयावर नाराज आहेत. त्यात प्रामुख्याने समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी मंडळींचा समावेश आहे. याशिवाय गेली काही वर्षे ज्या संघटना बाबासाहेबांच्या इतिहास लेखनावर संघटितपणे आणि आक्रमकपणे तुटून पडत आलेल्या आहेत त्या ब्रिगेडी आणि बामसेफींनी जोरदार मोर्चेबांधणी करून विरोधाची राळ उडवून दिलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पुरंदरे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे खरे इतिहासकार नाहीत असे आव्हाड यांनी म्हटले होते. या वक्तव्याचे शरद पवार यांनीही अप्रत्यक्षपणे समर्थन केलेले आहे. आव्हाड यांनी पुरंदरे यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेत टि्वटवर काही प्रश्न उपस्थित केले होते. आदरणीय जिजाऊंचे चारित्र्यहनन करणाऱ्या जेम्स लेनने पुस्तकात बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार कसे काय व्यक्त केले आहे. त्यावर पुरंदरे यांनी अद्याप एकही चकार शब्द का काढलेला नाही? बाबासाहेब पुरंदरे हे इतिहास तज्ज्ञ होते तर त्यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त लिखाणावर टीका का केली नाही? पुरंदरे यांना ते काही खटकले नाही का? त्यांना यात काही आक्षेप वाटला नाही का? म्हणूनच ते गप्प आहेत का? असे खोचक प्रश्न आव्हाड यांनी टि्वटरवर विचारले होते.
भारतातील कोणत्याही इतिहासतज्ज्ञाला जी माहिती मिळवता आली नाही ती जेम्स लेनसारख्या परदेशी इतिहासकाराला कशी व कोठून मिळाली असा सवाल त्यांनी उपस्थित करीत या मूळ प्रकरणाशी बाबासाहेब पुरंदरेच आहेत असे अप्रत्यक्षरित्या सूचित केले होते. आता शिवसेनेने पुरंदरे यांना पद्मश्री देण्याची शिफारस केल्याने आगामी काळात यावरून राजकीय आणि सामाजिक रणकंदन माजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पुढे वाचा, जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत केलेले खोचक टि्वट...