आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा उपक्रमश्ः दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांना यूपीएससीची मोफत शिकवणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत रविवारी झालेल्या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते यूपीएससीतील यशस्वी उमेदवार व औरंगाबादचा रहिवाशी अनिकेत पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. - Divya Marathi
मुंबईत रविवारी झालेल्या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते यूपीएससीतील यशस्वी उमेदवार व औरंगाबादचा रहिवाशी अनिकेत पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला.
मुंबई - प्रशासनात मराठी टक्का वाढावा या हेतूने स्थापन करण्यात अालेल्या बाळासाहेब ठाकरे आयएएस अकॅडमीने दरवर्षी राज्यातील एक हजार विद्यार्थ्यांना ‘यूपीएससी’ची माेफत शिकवणी देण्याचा संकल्प साेडला अाहे. शिवसेनेतर्फे राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमात राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना विशेष प्राधान्य देण्यात येणार अाहे,
हे विशेष.

ठाकरे अकॅडमीच्या यंदाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या १० विद्यार्थ्यांचा रविवारी मुंबईत रवींद्र नाट्यमंिदरात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व ज्येष्ठ सनदी अधिकारी भूषण गगराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योगमंत्री देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘सी. डी. देशमुख यांच्यासारख्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे नाव देशात उंचावले आहे. सनदी सेवेत जाऊन अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावता येतात. तसेच नागरिकांचे जीवन सुसह्य करता येते. याचे कायम भान ठेवा,’ असा सल्ला देसाईंनी यशस्वी युवकांना दिला. यूपीएससी परीक्षेचे स्वरूप बदलले आहे. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखनावर अधिक भर द्यावा. तसेच इंग्रजीचा न्यूनगंड न बाळगता यूपीएससी परीक्षांना सामोरे जावे, असा कानमंत्र गगरानी यांनी दिला. कार्यक्रमास ठाण्याचे महापौर संजय मोरे, शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सामतकर, प्रकाश कारकर,सेनेचे िवभाग संघटक साधना माने यांची उपस्थिती होती.
मराठी युवक पहिला यावा
महाराष्ट्रातील विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत देशात पहिला यावा हा बाळासाहेब ठाकरे अकॅडमीचा ध्यास असल्याचे अकॅडमीचे संचालक व शिवसेना उपनेते विजय कदम यांनी सांगितले. डॉ. अभिजित शेवाळे, अनिकेत पेडणेकर, उमेश खंडबहाले, डॉ. संदीप गुंजाळ, डॉ. श्रीधर धुमाळ, तुषार निखारे, महेश लोंढे या यंदाच्या वर्षी यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी आपले अनुभव सांगितले.
२० हजार उत्सुक
यंदा बाळासाहेब ठाकरे अकॅडमीत प्रवेश मिळावा यासाठी राज्यातील २० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षा दिली असून त्यातील हजार टॉपर्सना प्रवेश देण्यात येईल.
शिक्षण मोफत
दरवर्षी एक हजार विद्यार्थ्यांना या अकॅडमीत प्रवेश देण्यात येतो. मुख्य परीक्षा होईपर्यंतचा सर्व खर्च अकॅडमीतर्फे करण्यात येतो.
लवकरच विस्तार
सध्या ठाकरे अकॅडमीचे मुख्य कार्यालय मुंबईत प्रभादेवी येथे आहे. राज्यात १९ जिल्ह्यांत लवकरच या अकॅडमीच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत.
मराठी टक्का नक्कीच वाढेल
यूपीएससी परीक्षा देण्यासाठी चांगली कोचिंग घ्यावी लागते. त्यासाठी दिल्ली आणि इतर मोठ्या शहरात जावे लागते. लाखो रुपये मोजावे लागतात, हा समज बाळासाहेब ठाकरे या अकॅडमीने साफ खोटा ठरवला आहे. ही अकॅडमी मराठी तरुणांसाठी आधार ठरली आहे. त्यामुळे या अकॅडमीचा सर्वांनी उपयोग करून घ्यावा, असे यूपीएससी परीक्षेतील यशस्वी उमेदवार व औरंगाबादचा युवक अनिकेत पेडणेकर यांनी सांगितले. या वेळी इतर यशस्वी उमेदवारांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘राज्यातील तरुणांसाठी या अकॅडमीसारख्या संस्थेतून मार्गदर्शन मिळाल्यास यूपीएससीत नक्कीच मराठी टक्का वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...