आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Going To Show Power On Occasion Death Anniversary Of Balasaheb Thackeray

शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनी सेना दाखवणार ताकद,BJP नेत्यांच्या उपस्थितीबाबत शंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतिदिन सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी आहे. शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुखांच्या शक्तिस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने येणार असून या वेळी शिवसेनेची ताकद भाजपला दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. शिवसेना आणि भाजपमधील वाढलेल्या वितुष्टामुळे भाजप नेते मात्र श्रद्धांजली कार्यक्रमास जावे की न जावे या मन:स्थितीत असल्याचे समजते.

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने शिवसेनेला दिलेल्या महाअपमानास्पद वागणुकीमुळे शिवसैनिक भाजपवर प्रचंड नाराज झालेला आहे. भाजपने शिवसेनाप्रमुखांचा अपमान केल्याची भावना शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळे स्मृतिदिनाच्या निमित्ताने भाजपला शिवसेनेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवाजी पार्कवर गोळा होणार आहेत. ज्याप्रमाणे सहा डिसेंबर रोजी भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर एकत्र येतात अगदी त्याच धर्तीवर शिवसैनिक रविवारी रात्रीपासूनच शक्तिस्थळाकडे कूच करणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासोबत शक्तिस्थळावर येऊन शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहणार असून राज्यभरातील शिवसेना नेते आपल्या समर्थकांसह शिवाजी पार्कवर उपस्थित राहणार आहेत.

भाजप नेत्यांनी घेतला धसका
मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांची शिवाजी पार्कवर गर्दी होणार असल्याने भाजप नेते मात्र चिंतित आहेत. भाजप आणि शिवसेनेमधील वाढलेले वितुष्ट पाहता भाजप नेत्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विपरीत परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून भाजप नेते जाण्याबाबत विचार करत असल्याची माहिती भाजपतील एका वरिष्ठ नेत्याने दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील काही मंत्री शक्तिस्थळावर जाऊन शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहतील. मंत्री असल्याने त्यांच्या सुरक्षेची काळजी पोलिस घेतीलच. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिकांनी भाजप नेत्यांना शक्तिस्थळी येऊ न देण्याचा पवित्रा घेतला आहे. याबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. श्रद्धांजली वाहण्यासाठी भाजप नेते येणार असल्याने त्यांचा अपमान करणे योग्य होणार नाही, असे शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत असल्याचेही सांगण्यात येत आहे. भाजप नेत्यांचे स्वागत करायचे की त्यांचा अपमान याचा निर्णय रविवारी सायंकाळी घेण्यात येणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.