आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपशी युतीचा शिवसेनेलाही फायदा; 23 नगराध्यपदे जिंकली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपशी मैत्रीचा निर्णय घेण्यासाठी घाेळ घालून उशिरा का हाेईना घेतलेला युतीचा निर्णय शिवसेनेच्या पथ्यावर पडला. सन २०११ मध्ये केवळ २६४ जागा मिळवलेल्या शिवसेनेने यंदा तब्बल ४०२ जागा मिळवून चांगलीच मुसंडी मारली. या वाढत्या जनाधारामुळे सन २०१९ च्या निवडणुकीसाठी शिवसेनेला बळ प्राप्त झाले आहे. युतीमुळे भाजप-शिवसेनेच्या नगराध्यक्षांची संख्या ८० पर्यंत पाेहाेचली असून ही टक्केवारी ५५ पर्यंत जाते. यात शिवसेनेचे २३ नगराध्यक्ष आहेत. भाजपनंतर शिवसेनेचेच नगराध्यक्ष जास्त आहेत.

राज्यातील १४७ पैकी १५ नगरपालिकांत शिवसेनेने एकहाती सत्ता प्राप्त केली आहे. २०११ मध्ये अनेक ठिकाणी खातेही न उघडणाऱ्या शिवसेनेला या निवडणुकीत मात्र भरगच्च कमाई करणे शक्य झाले आहे. २०११ मध्ये ६९ नगर परिषदांमध्ये विजय मिळवत शिवसेनेने २६४ जागा जिंकल्या होत्या, तर ७८ ठिकाणी त्यांना एकही जागा मिळाली नव्हती. या वेळी मात्र शिवसेनेने अनेक जागांवर खाते उघडले आहे. २०११ मध्ये पालघर, चाकण, गोंदिया, आळंदी, राजगुरूनगर अशा माेजक्याच ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष वा उपनगराध्यक्ष होता. मात्र यंदा ही संख्या वाढल्याचे दिसते. शिवसेनेने जर अगोदर युती केली असती तर दोन्ही पक्षांना आणखी जास्त फायदा झाला असता हे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्यही दाेन्ही पक्षाला एकमेकांची गरज असल्याचे सांगून जाते. मराठवाड्यातील उस्मानाबाद, पूर्णा, वसमत, कळमनुरी आणि मानवत या पाच ठिकाणची नगराध्यक्षपदे शिवसेनेने मिळवली अाहेत. यवतमाळच्या दारव्हातही शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने विदर्भ व मराठवाड्यात केलेले काम, सरकारविराेधी काढलेले माेर्चे व अात्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना केलेल्या भरीव मदतीचाही शिवसेनेला या निवडणुकीत लाभ झाल्याचे सांगितले जाते.

काेकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने चांगले यश मिळवले आहे. खेडमध्ये १७ पैकी १० जागांवर शिवसेनेने विजय मिळवला आहे. गेल्या वेळी फक्त सात जागा मिळाल्या हाेत्या. रत्नागिरीत ३० पैकी १७ (मागील वेळी १३) आणि चिपळूणमध्ये १० (मागील वेळी ४) जागांवर शिवसेनेने विजय प्राप्त केला आहे. उत्तर महाराष्ट्रातही शिवसेनेने मुसंडी मारली असून नाशिकमधील सहापैकी चार ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. राजापूर ८ (मागील वेळी ३) आणि दापोली ७ (मागील वेळी ४) जागांवर शिवसेना जिंकली.

पक्षनेत्यांमध्ये नाराजी
गेल्या वेळपेक्षा यंदा चांगले यश मिळूनही शिवसेनेने विजयावर रात्री उशिरापर्यंत प्रतिक्रिया दिली नव्हती. विधानसभा निवडणुकीतही ६० च्या वर आमदार निवडून अाणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तेव्हाही गप्प राहणे पसंत केले होते. मात्र काही महिन्यांनंतर त्यांनी कसा एकहाती विजय मिळवला हे सांगण्यास सुरुवात केली होती. आताही चांगले यश मिळाले असतानाही पहिला वा दुसरा क्रमांक न मिळाल्याने शिवसेना नेते नाराज असल्याचेच दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...