आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदार जल्लोषात, पहिल्या दिवशी विरोधी बाकावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपने शिवसेनेला सोबत घ्यावे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर दुस-याच दिवशी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनीही विधानभवनात हिंदुत्वाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला.

नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी आयोजित तीनदिवसीय विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. पहिला दिवस नूतन सदस्यांच्या शपथविधीचा होता. नव्या अध्यक्षांची निवड बुधवारी होणार असल्याने हंगामी अध्यक्ष म्हणून जिवा पांडू गावित यांची नियुक्ती करण्यात आली. विधानभवनात प्रवेश करण्यापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी सकाळी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर हे सर्व आमदार विधानभवनाकडे आले. भगवे फेटे आणि गळ्यात शिवसेना लिहिलेले उपरणे घालून प्रवेश केलेले आमदार विरोधी बाकांवर बसले आणि विराेधी पक्षातच बसण्याचाच पवित्रा असल्याचे दाखवून दिले. भाजप-शिवसेनेची युती न झाल्याने शिवसेनेला दुसरा मोठा पक्ष असल्याने विरोधी बाकांवर बसणे क्रमप्राप्तच होते.

सोमवारी पंधराव्या विधानसभेतील सुमारे २०० आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उर्वरित नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी मंगळवारी होणार आहे. त्यामुळे मंगळवारीही शिवसेना विरोधी बाकांवरच बसणार हे नक्की. बुधवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. त्यापूर्वी राज्यपालांचे अभिभाषण होणार असून त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण मागच्या बाकावर
पहिल्या रांगेत जागा नसल्याने पृथ्वीराज चव्हाण यांना सभागृहात मागे बसावे लागले. माजी मुख्यमंत्री असल्याने कोणी तरी उठून त्यांना पुढे जागा देईल असे वाटत होते; परंतु कोणीही चव्हाणांसाठी जागा रिकामी केली नाही. याबाबत काँग्रेसच्या एका आमदाराने सांगितले, मुख्यमंत्रिपदी असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारांना विश्वासात घेतले नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणाच्याही मनात प्रेम नाही. त्याचेच प्रत्यंतर सभागृहात दिसले, असेही या आमदाराने म्हटले.

तीन आमदारांची संस्कृतमधून शपथ
भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा, गिरीश बापट व गिरीश महाजन या तीन आमदारांनी सभागृहात संस्कृतमधून शपथ घेतली, तर खान्देशातील जयकुमार रावल यांनी अहिराणी भाषेतून शपथ घेतली. भाजपचे तारासिंग व समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली.

हरिभाऊ बागडेंचे अध्यदासाठी नाव
भाजपतर्फे हरिभाऊ बागडे हे विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांच्या नावाला शिवसेनेने जर पाठिंबा दिला तर बागडेंची निवड नक्कीच होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, आता या पदासाठी शिवसेनाही उमेदवार देणार असल्याचे आमदार नीलम गाे-हे यांनी साेमवारी सांगितले.