आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shivsena Leader Babanrao Gholap Convicted & Prison For 3 Years

माजी मंत्री घोलपांना तीन वर्षे सक्तमजुरी, आमदारकीसह लोकसभेची उमेदवारीही धोक्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राजकारणाला बेहिशेबी मालमत्ता गोळा करण्याचा राजमार्ग समजणा-या देशभरातील राजकारण्यांना सणसणीत चपराक लगावणारा ऐतिहासिक निकाल मुंबईच्या एका सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिला. माजी मंत्री व शिवसेनेचे देवळालीचे (जि. नाशिक) आमदार बबनराव घोलप यांना त्यांच्या पत्नीसह दोषी ठरवून तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा कोर्टाने ठोठावली.


दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवणारा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. यानुसार शिर्डीमधून लोकसभेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर होऊनही घोलप अपात्र ठरले आहेत. त्यांची आमदारकीही तत्काळ रद्द होईल. 13 वर्षे चाललेल्या या खटल्यात न्यायाधीश व्ही. ए. दौलताबादकर यांनी हा निकाल दिला. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये ज्ञात स्रोतांच्या 190 टक्के अधिक संपत्ती जमवणे, खोटी माहिती, कागदपत्रे बनवणे अशा गुन्ह्यांखाली घोलप व पत्नी शशिकला यांना प्रत्येकी 3 वर्षे सश्रम कारावास, एक लाखाचा दंड व दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली. अटक टाळण्यासाठी त्यांनी जामीनही मिळवला.
दरम्यान, दंडाची रक्कम व जामिनाची रक्कम भरून घोलप यांनी जामीन मिळवला आहे.
या निकालामुळे पोलिसांकडून अटक टाळण्यासाठी त्यांनी दंडाचे दोन लाख आणि जामिनासाठी 50 हजार भरून तात्काळ जामीन मिळवला.


सन 2000 मध्ये 10 खंडांमध्ये सहा हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र घोलप दांम्पत्यांवर दाखल करण्यात आले. सुमारे 13 वर्षे आम्ही हे प्रकरण लढतोय. न्यायालयाने दोनदा त्यांना त्यांच्या संपत्तीबद्दल खुलासा मागितला. दोन्ही वेळेस ते कोणताही खुलासा करू शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली, अशा शब्दांत पोलिसांच्या वकील कल्पना राणे आणि तपास अधिकारी रमेश महाले यांनी आनंद व्यक्त केला. या प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यापासून आजवर घोलप यांच्या सर्व बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

घोलप दांम्पत्यांची विनंती
हा निकाल सुनावताना न्यायाधीशांनी बबनराव घोलप यांना त्यांचे मत विचारले. तेव्हा आपण गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ या प्रकरणी न्यायालयासमोर येत आहोत. त्याचा विचार करून कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती घोलप आणि त्यांच्या पत्नी शशिकला यांनी न्यायालयाला केली.


न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढला : अण्णा
* या निकालामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास वाढला आहे, अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी निकालाचे स्वागत केले. घोलप यांच्या सर्व भ्रष्टाचाराचे पुरावे होते. 1999च्या प्रकरणात अन्य नेत्यांविरुद्धही आपण तक्रार केली होती, असे ते म्हणाले.
* घोलप यांची उमेदवारी जाहीर होताच आपण उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले, पण त्यांनी उत्तर दिले नाही. घोलप यांच्यासारख्या भ्रष्ट उमेदवाराबाबत आता शिवसेनेनेच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. घोलप यांची संपत्ती जप्त करण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली.


पद्मसिंह पाटलांचे काय ? खुनाच्या सुपा-या देणारे, साखर कारखाने, जिल्हा बँक, कारगिल व भूकंपग्रस्तांच्या निधीमध्ये कोटींचा भ्रष्टाचार करणारे पद्मसिंह पाटील यांच्यासारखे लोक संसदेत गेले, तर या देशाला उज्ज्वल भवितव्य कसे मिळणार, असा सवाल अण्णांनी शरद पवार यांना पत्राद्वारे केला. पद्मसिंह पाटलांसारख्या भ्रष्ट लोकांना लोकसभेत पाठवून आपण कोणता राष्ट्रवाद साध्य करणार आहात, असा सवालही त्यांनी केला.


अण्णांनी केला पर्दाफाश...
युती सरकारच्या काळात घोलप यांच्याकडे समाजकल्याण विभागाचे मंत्रिपद सोपवण्यात आले होते. या काळातच घोलप यांनी पदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांमुळेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर घोलप यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केल्याने अण्णांना 14 दिवस तुरुंगात काढावे लागले होते.


यावतकरांनी जिंकली लढाई
अण्णांनंतर मिलिंद यावतकर या राजकीय कार्यकर्त्याने हे प्रकरण हाती घेतले. त्यांनी प्रचंड मेहनत घेत एकेक दस्तऐवज मिळवला. 1999 मध्ये त्यांनी केलेल्या तक्रारीवर आधी पोलिस अधिकारी सुरेश भालेकर आणि नंतर रमेश महाले यांनी चिकाटीने शोधकार्य करून घोलप यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ, बनवेगिरी पुराव्यानिशी उघडी पाडली.


घोलपांचे मायाजाल : ०घोलप युतीच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांची 16 बँक खाती, सहा वाहने, 10 भूखंड व सदनिका आढळल्या. ०यापैकी बहुसंख्य संपत्ती त्यांनी मंत्रिपदाच्या काळातच गोळा केल्याचे सिद्ध झाले. ०घोलप यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख असताना त्यांचा खर्च मात्र 80 लाख होता. ० 1999 मध्ये त्यांच्याकडे 1 कोटी बेहिशेबी मालमत्ता आढळली.