आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: कर्जमाफीही आमच्या मनासारखी; शिवसेना मंत्र्याचा दावा; पाटील आज मातोश्रीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘राज्यातील शेतकऱ्यांबाबत शिवसेना अत्यंत गंभीर असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सातबारा कोरा होईल अशाच प्रकारची कर्जमाफी आम्ही भाजपकडून करून घेऊ. ज्याप्रमाणे जीएसटीला उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून मंजुरी दिली तसेच कर्जमाफीबाबतही होईल,’ असे शिवसेनेच्या एका वरिष्ठ मंत्र्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.  दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी ‘माताेश्री’वर जाऊन ठाकरेंशी कर्जमाफीबाबत चर्चा करणार अाहेत.   
 
शिवसेनेच्या मंत्र्याने सांगितले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यरात्री शेतकऱ्यांशी चर्चा करून कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु तो फक्त अल्पभूधारकांसाठीच होता. त्यामुळे आमच्याशी कोणत्याही प्रकारे चर्चा केली नव्हती आणि शेतकरी नेत्यांसोबतच्या बैठकीलाही आम्हाला बोलावले नव्हते. मुख्यमंत्र्यांचा निर्णय मान्य नसल्याने आम्ही आंदोलन सुरू ठेवले. उद्धव ठाकरे हे सरसकट कर्जमाफीची मागणी पूर्वीपासूनच करत आले आहेत. त्यामुळे सरसकट कर्जमाफीसाठी आम्ही सरकारवर दबाव टाकला. आमच्या दबावामुळेच सरकारने सरसकट कर्जमाफी केली.’
 
‘सरसकट कर्जमाफीसाठी निकष तयार करण्यासाठी एक समिती तयार करण्यात येत आहे. या समितीत आमचेही मंत्री आहेत. शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याची चर्चा उद्धव ठाकरे यांच्याशी करून त्याप्रमाणे सरकारकडून निकष तयार करण्यात येतील. जर आमचे म्हणणे ऐकले नाही तर आम्ही निकष तयार होऊ देणार नाही. जोपर्यंत उद्धव ठाकरे निकष मंजूर करीत नाहीत तोपर्यंत आम्ही लढा सुरू ठेवू,’ असेही या मंत्र्याने सांगितले.

अाजच्या बैठकीनंतर भूमिका स्पष्ट करणार  
यापूर्वी ‘जीएसटी’साठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माताेश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसमाेर सादरीकरण केले हाेते. अाता महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बुधवारी ठाकरे यांना भेटणार आहेत? याबाबत विचारले असता शिवसेनेच्या मंत्र्याने सांगितले, ज्याप्रमाणे जीएसटीचा निर्णय आम्ही आम्हाला जसा हवा होता तसा करून घेतला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे निकषही आम्ही तयार करणार आहोत. बैठकीची माहिती आम्ही उद्धव ठाकरे यांना दिलेली आहेच. चंद्रकांत पाटील यांच्याशी याबाबतच उद्धव ठाकरे चर्चा करतील आणि त्यानंतरच शिवसेना पाठिंबा किंवा विरोध जाहीर करील.  
 
बातम्या आणखी आहेत...