मुंबई - 2009 च्या विधानसभा निवडणुकीनंतर यंदाच्या लोकसभेतही शिवसेनेपेक्षा भाजपचे उमेदवार जास्त संख्येने निवडून आल्याने युतीत कायम ‘थोरल्या भावा’च्या भूमिकेत राहिलेल्या शिवसेनेचे ‘मोठेपण’ धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही आता राज्यात जास्तीच्या जागा मागण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आपला मित्रपक्षच डोईजड होऊ नये म्हणून शिवसेनेने जास्तीचे मंत्रिपदे मागून किंवा पाकिस्तान पंतप्रधानांच्या भारत भेटीच्या मुद्द्यावर ‘मोदी सरकार’वर दबाव टाकण्याची खेळी खेळल्याचे बोलले जाते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा राज्यात जास्त जागा जिंकल्याने आगामी विधानसभेत भाजप अधिक जागांची मागणी करण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. तशा आशयाची वक्तव्येही भाजपच्या नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेपेक्षा पन्नासेक जागा कमी लढवूनही भाजपने त्यांच्यापेक्षा एक आमदार जास्तच निवडून आणला होता. परिणामी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे आहे.
महाराष्ट्रात शिवसेना- भाजपची 25 वर्षापासूनची युती आहे. या काळात शिवसेनाप्रमुखांनी नेहमीच शिवसेनेचे महत्त्व कायम ठेवून भाजपला ‘धाकट्या भावा’ची जागा दिली होती. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेल्या भाजपने राज्यातील प्रचारात शिवसेनेला फारसा भाव न देता उलट दुय्यम लेखण्याचे धोरण अवलंबिले होते. त्यामुळे युतीतले आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी शिवसेनेने धडपड सुरू केली आहे. यातूनच केंद्रात अधिकच्या मंत्रिपदाची मागणी पुढे आली आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही मोदी यांनी निमंत्रित केल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजीची भावना आहे. या सर्व मुद्द्याच्या माध्यमातून भाजपच्या नेतृत्वावर दबाव आणून आपले महत्त्व वाढविण्याची शिवसेना नेतृत्वाची खेळी असल्याची राजकीय
वर्तुळात चर्चा आहे.
शिवसेनेला नकोय नमनाला अपशकून
नवनिर्वाचित 18 खासदारांसह रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी कोकणातल्या भराडी देवीचे दर्शन घेतले. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर त्यांनी आपला नवस फेडला. सायंकाळी मुंबईत परतताच त्यांनी पक्षातील निवडक नेत्यांशी चर्चा करून मोदींच्या शपथविधीसाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ‘शपथविधीवर बहिष्काराची भूमिका घेऊन आपण अपशकून करू इच्छित नाही. मात्र आपली पाक विरोधाची भूमिका कायम असून यापुढे भाजपने आपल्या भूमिकेचा आदर करावा’, अशी भूमिका शिवसेना घेण्याची शक्यता आहे.
छायाचित्र - पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांनी रविवारी कोकणातील भराडी देवीचे दर्शन घेऊन नवसपूर्ती केली. यावेळी उद्धव यांनी सपत्नीक पूजाही केली.
पुढील स्लाइडमध्ये, मुंबईत उद्धव यांचे फोटो असलेल्या होर्डिंग्जची धूम